स्टॉकहोम : कॅनडाच्या ख्यातनाम लेखिका, कवयित्री आणि अनुवादक अॅन कार्सन यांना २०२६ या वर्षाचा मानाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. प्राचीन अभिजात परंपरेशी संवाद साधत, समकालीन साहित्याला नवी रूपे देणाऱ्या त्यांच्या धाडसी, नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मितीचा गौरव करण्यासाठी स्वीडिश अकादमीने या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.
साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेत्या अॅन कार्सन यांचा जन्म १९५० मध्ये कॅनडातील टोरंटो येथे झाला. त्यांनी १९८१ मध्ये अभिजात साहित्यात (क्लासिक्स) ‘ओदी एत अमो एर्गो सुम’ (Odi et Amo Ergo Sum) या विषयावर आपला डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी कविता लेखनासोबतच अभिजात ग्रंथांचे अनुवाद आणि विविध नामांकित विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य सातत्याने केले आहे.
शब्दांमागचा इतिहास जाणून घेण्याची आवड आणि त्यांना नवीन अर्थ देण्याची कवीची दृष्टी, या दोन्हींचा मेळ कार्सन यांच्या साहित्यात दिसतो. शब्दांचा मूळ उगम शोधणे हाच आपल्या संपूर्ण लेखनाचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या वयाच्या ७६ व्या वर्षीही साहित्यात सक्रिय असलेल्या कार्सन या त्यांच्या संकरित (हायब्रिड) लेखनशैलीसाठी जागतिक स्तरावर ओळखल्या जातात.
कविता आणि गद्य यांचा सुरेख मेळ घालत, प्राचीन पुराकथांना समकालीन संदर्भांची जोड देणे हे त्यांच्या साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. १९९८ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची ‘ऑटोबायोग्राफी ऑफ रेड’ (Autobiography of Red) ही कादंबरी त्यांच्या सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींपैकी एक मानली जाते. हेरॅक्लीसवरील ग्रीक महाकाव्याचे पुनर्लेखन करत त्यांनी या पद्यकादंबरीतून वेगळा दृष्टिकोन मांडला होता.
याशिवाय, २०१९ मध्ये रंगभूमीवर सादर झालेली त्यांची ‘नोर्मा जीन बेकर ऑफ ट्रॉय’ (Norma Jeane Baker of Troy) ही प्रायोगिक नाट्यकृती त्यांच्या अद्वितीय शैलीचे उत्तम उदाहरण आहे. यात त्यांनी युरिपिडिसच्या ‘हेलन’ नाटकातील ट्रॉयची हेलन आणि विसाव्या शतकातील प्रसिद्ध अभिनेत्री मॅरिलिन मन्रो या दोन पात्रांच्या जीवनाचा अनोखा अनुबंध गुंफला होता.
साहित्यातील नोबेल पुरस्काराची निवड अनेकदा जगभरातील साहित्यप्रेमींमध्ये चर्चेचा आणि मतांतरांचा विषय ठरत असतो. अलेक्झांडर सोल्झेनित्सिन, अॅलिस मुन्रो आणि अर्नेस्ट हेमिंग्वे यांसारख्या जागतिक साहित्यविश्वातील दिग्गजांच्या पंक्तीत आता अॅन कार्सन यांनीही आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे कॅनेडियन साहित्यवर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.