British colonial loot | भारतातील लुटीमुळेच आजचे पाश्चिमात्य जग समृद्ध  file photo
आंतरराष्ट्रीय

British colonial loot | भारतातील लुटीमुळेच आजचे पाश्चिमात्य जग समृद्ध; 'ऑक्सफॅम'चा अहवाल

वसाहतवादी काळात ६४.८२ ट्रिलियन डॉलर इंग्लंडला

पुढारी वृत्तसेवा

दावोस : ब्रिटिशांच्या वसाहतवादाच्या (British colonial) काळात १७६५ ते १९०० काळात भारतातून ६४.८२ ट्रिलियन डॉलर इतकी संपत्ती इंग्लंडला लुटून नेण्यात आली. सध्याच्या काळात त्याचे समायोजित मूल्य ३३.८ ट्रिलियन डॉलर एवढे आहे. 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा' असे वर्णन असणाऱ्या भारतवर्षाची लूट करून इंग्लंडमधील १० टक्के श्रीमंत अधिक समृद्ध झाले, असा अहवाल जगत्विख्यात ऑक्सफॅम इंटरनॅशनलने (Oxfam International report) प्रकाशित केला.

या अहवालाचे नावच 'टेकर्स, नॉट मेकर्स' असे आहे. येथील जागतिक अर्थ परिषदेत प्रकाशित करणाऱ्या या अहवालात वसाहतवादाने असमानता आणि आर्थिक पद्धतीवर कसा कायमचा परिणाम केला, ते यात स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात केलेल्या लूटमारीच्या जोरावर आजचे आधुनिक जीवनमान आकारत असल्याचे त्यात म्हटले आहे. मोजक्या उच्चभ्रंना लाभ करून देण्यासाठी जागतिक दक्षिणेकडून जागतिक उत्तरेकडे संपतीची लूट नेण्याची एक यंत्रणा कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यात आली, असे सांगून असमानता आणि आर्थिक यंत्रणेचा ऱ्हास त्यात झाल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले. दक्षिणेकडील राष्ट्राकडून केलेली ही लूट उत्तरेकडील राष्ट्रातील श्रीमंतांच्या लाभासाठी करण्यात आली. एकट्या भारतातून फक्त ब्रिटनने केलेली लूट ही लंडनच्या क्षेत्रफळावर ५० ब्रिटिश पाऊंडच्या नोटा ठेवल्या तर त्याचे चार थर होतील. केवळ १० टक्के श्रीमंतांनाच भारतातून केलेल्या लुटीचा लाभ झाला असे नाही, तर इंग्लंडमधील मध्यमवर्गालाही त्याचा लाभ झाला. त्यांच्या उत्पन्नांपैकी ३२ टक्के उत्पन्न हेच होते, असे 'ऑक्सफॅम'ने नमूद केले आहे.

भारताचा जागतिक औद्योगिक उत्पन्नात वाटा १७६५ मध्ये २५ टक्के होता, तो १९०० मध्ये केवळ दोन टक्क्यांवर आला. आशियाई वस्त्रोद्योगावर ब्रिटनने पद्धतशीर कठोर बंधने लादल्यामुळे भारतीय औद्योगिक वाढ रसातळाला गेली, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात वसाहतीतील औद्योगिक उत्पादन वाढले गेले. या बाह्य धक्क्यांमुळे वसाहत राष्ट्रांतील दडपशाही कमी झाली होती.

बहुराष्ट्रीय कंपन्या अन् वसाहतवादी लूट

'ऑक्सफॅम'ने सध्याच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मूळ हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीसारख्या संस्थांमध्ये दडले आहे. भागधारकांच्या जीवावर चालणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या हे वसाहतवाद पर्वाचे उत्पादन असल्याचे सांगून आपला विरोध दडपून टाकण्यासाठी या संस्था खासगी सैन्य नेमतात, असे या अहवालात म्हटले आहे. ईस्ट इंडिया कंपनीकडे दोन लाख ६० हजार सैन्य होते. ब्रिटिशांच्या शांतताकालीन सैन्याच्या ते दुप्पट होते, याकडे त्यात लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT