ब्रासीलिया : व्यसन हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि काहीवेळा प्राणघातक ठरू शकते. याचेच एक दुःखद उदाहरण ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यात नुकतेच समोर आले आहे. मुलीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर, एका पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा कोकेन सेवन केल्यामुळे आणि त्यानंतर अतिउष्ण पाण्याने आंघोळ केल्यामुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय पोलिस अधिकारी जेफरसन लुईझ सागाझ आणि त्यांची पत्नी तथा ब्युटी सलूनची मालकीण अना कॅरोलिना सिल्वा हे ११ ऑगस्टच्या रात्री डलास मोटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. तपासणीदरम्यान या जोडप्याचे मृतदेह मोटेलमधील बाथटबमध्ये आढळून आले.
शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण उघड झाले. त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे (Heatstroke) झाला होता. ज्या बाथटबमध्ये त्यांचे मृतदेह आढळले, त्यातील पाण्याचे तापमान १२२ अंश फॅरेनहाइट (अंदाजे ५० अंश सेल्सिअस) इतके होते.
या अहवालानुसार, दोघांच्याही शरीरात अल्कोहोल आणि कोकेन या दोन पदार्थांची उपस्थिती आढळली. या मादक द्रव्यांमुळे त्यांची संवेदनशीलता (Sensitivity) इतकी कमी झाली होती की, त्यांना पाण्याची अतिउष्णता जाणवली नाही. या तीव्र उष्म्यामुळे त्यांना उष्माघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना मादक पदार्थांचे सेवन किती प्राणघातक ठरू शकते, याचे गंभीर उदाहरण आहे.