India-US trade deal | रशियन तेलावर ब्रेक; अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक File photo
आंतरराष्ट्रीय

India-US trade deal | रशियन तेलावर ब्रेक; अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नव्या व्यापार कराराचे व्हाईट हाऊसकडून स्वागत करण्यात आले आहे. यानुसार भारताने रशियन तेलाची खरेदी थांबवण्याची तयारी दर्शवली असून, अमेरिकेतील प्रमुख क्षेत्रांमध्ये सुमारे 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी मंगळवारी सांगितले.

लेव्हिट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय चांगले संबंध आहेत आणि हा करार त्याचाच परिणाम आहेे. भारत आता रशियन तेल खरेदी करणार नाही. उलट अमेरिकेकडून आणि शक्यतो व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल. याचा थेट फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना होईल.

500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

भारत अमेरिकेतील ऊर्जा, वाहतूक आणि कृषी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी उत्पादने आणि कोळसा यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचीही भारताने बांधिलकी दर्शवली आहे.

अमेरिकन वस्तूंवर भारताकडून शून्य टॅरिफ आकारला जाणार आहे, असे सांगून लेव्हिट यांनी याला ‘अमेरिकन कामगार, उद्योग आणि ग्राहकांसाठी मोठा विजय’ असे संबोधले.

मोदी-ट्रम्प संबंध अधिक मजबूत

पंतप्रधान मोदी यांनी या कराराचे स्वागत करताना सांगितले की, ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांसाठी कमी टॅरिफ मिळणे हे 1.4 अब्ज भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे. त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानत भारत-अमेरिका भागीदारी पुढील काळात अधिक उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

व्हाईट हाऊसच्या दाव्यानुसार

* भारत रशियन तेलाची खरेदी थांबवण्यास तयार

* अमेरिकेत 500 अब्ज डॉलर्सची भारतीय गुंतवणूक

* अमेरिकी टॅरिफ 18 टक्क्यांवर

* अमेरिकन वस्तूंवर भारतात शून्य टॅरिफ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT