पुढारी ऑनलाईन डेस्क : आज सर्वसामान्याच्या जगण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये इंटरनेट हा शब्द अग्रस्थानी आहे. कारण आज इंटरनेट आणि त्याचबरोबर सोशल मीडिया सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांपैकी आहे. आपल्या जगण्यातील प्रत्येक गोष्टीत इंटरनेट आणि सोशल मीडियाने व्यापली आहे. त्याच्याशिवाय जगणं ही कल्पनाच बहुतांश जणांना अशक्यप्राय वाटते. त्यामुळेच सोशल मीडिया वापरासंदर्भातील ‘ब्रेन रॉट’ हा शब्द यंदा म्हणजे २०२४ वर्षासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून 'वर्ड ऑफ द इयर' ( Oxford Word of the Year) ठरला आहे. जाणून घेवूया या शब्दाचा अर्थ.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 साठी ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून 'ब्रेन रॉट' शब्दाची घोषणा केली आहे. 37,000 हून अधिक जणांनी निवडलेले आणि भाषा तज्ज्ञांनी मान्यता दिलेली हा शब्द सोशल मीडियाच्या अति वापराबाबत सामाजिक चिंता व्यक्त करतो. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणार्या मानसिक आणि बौद्धिक नुकसानाला 'ब्रेन रॉट' हा शब्द वापरला जातो.
तुम्ही जेव्हा तुमचा मोबाईल फोनची स्क्रीन स्क्रोल करत असता तेव्हा तुम्ही पाहत असलेला मजकूर तुमच्यासाठी उपयुक्त आहे की नाही? हे देखील तुम्हाला माहीत नसते. आपण काहीही न समजता किंवा विचार न करता स्क्रोल करत राहत सोशल मीडियाच्या दुनियेत दंग होतो. क्षुल्लक किंवा कमी-गुणवत्तेच्या ऑनलाइन सामग्रीच्या अतिवापरामुळे 'ब्रेन रॉट'ची प्रासंगिकतेत वाढला आहे. ब्रेन रॉट हा शब्द याच मानसिक अवस्थेसाठी वापरला जातो. तुम्ही अर्थहिन कमी दर्जाची सामग्री हाताळणे यासाठी ब्रेन रॉट हा शब्द वापरला जातो. २०२३ आणि २०२४ दरम्यान या शब्दाचा वापर तब्बल २३० टक्क्यांनी वाढला आहे.
ब्रेन रॉट हा शब्द सुमारे 170 वर्षांपूर्वी वापरला गेला होता. १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांनी आपल्या वॉल्डन या पुस्तकात सर्व प्रथम ब्रेन रॉट हा शब्द वापरला होता.समाजातील जटिल आणि गंभीर विचारांपेक्षा अत्यंत शुल्लक अशा कल्पनांना प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीवर टीका करण्यासाठी त्यांना या शब्दाचा वापर केला होता. "इंग्लंड बटाट्याच्या कुजण्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करत असताना, मेंदूच्या सडण्याला बरे करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही का, कारण मेंदू सडणे हे अधिक प्रमाणात आणि घातक आहे, असे थोरो यांनी आपल्या पुस्तकात नमूद करताना मेंदू सडण्याच्या प्रक्रियेला ब्रेन रॉट हा शब्द वापरला होता.
मागील दहा वर्षांमध्ये सोशल मीडियाने सर्वसामान्यांचे जगण व्यापले आहे. सोशल मीडियावर गंभीर व मूलभूत समस्यांपेक्षा अत्यंत शुल्लक आणि अर्थहीन अशा कल्पनांना अधिक प्राधान्य दिले जात आहे.आभासी जीवन भयावहरित्या विकसित होत आहे. ‘ब्रेन रॉट’ हा शब्द आभासी जीवनातील धोकाही दर्शवतो.