पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस विरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प असा सामना रंगला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक एलाॅन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे जाहीर समर्थन करत थेट त्यांच्या प्रचारातच सहभाग घेतला आहे. आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स ( Bill Gates) यांनी कमला हॅरिस यांच्या समर्थनात उतरले आहेत. बिल गेट्स यांनी हॅसिरच्या समर्थनात काम करणार्या एका ग्रुपला सुमारे ५० दशलक्ष डॉलर इतकी देणगी दिली असल्याचे वृत्त द न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे.
बिल गेट्स यांनी हॅसिरच्या समर्थनात काम करणार्या फ्युचर फॉरवर्ड या ग्रुपला सुमारे ५० दशलक्ष डॉलर इतकी देणगी दिली आहे. विशेष म्हणजे ही देणगी गुप्त ठेवण्यात आली आहे. गेट्स यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस उमेदवाराचे जाहीर समर्थन केले नाही. दरम्यान, या वर्षी खाजगी संभाषणात गेट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यास काय होईल, याबद्दल आपल्या मित्रांशी संवाद साधताना चिंता व्यक्त केली होती.
बिल गेट्स म्हणाले की, "आरोग्य सेवा, गरिबी निर्मुलन, अमेरिका आणि जगभरातील हवामान बदलाशी लढा देण्यासाठी वचनबद्धता दर्शविणार्या उमेदवाराला माझा पाठिंबा आहे. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांसोबत काम करण्याचा मोठा इतिहास आहे; पण ही निवडणूक वेगळी आहे. अमेरिकन आणि जगभरातील लोकांसाठी त्याचे वेगळे महत्त्व आहे."
माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्व्हेनियालामधील बटलर येथे ६ ऑक्टोबर रोजी सभा झाली होती. यावेळी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी हजेरी लावली होती. या सभेत ते नाचे आणि , 'संविधानाचे रक्षण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले होते.
यावेळी मस्क हे नाचतानाही दिसले. 'मतदान करा! मत द्या! मत द्या! लढा! लढा! लढा!, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली. मस्क म्हणाले, 'अमेरिकेतील संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विजय आवश्यक आहे.' डोनाल्ड ट्रम्पचे कौतुक करताना त्यांनी डेमोक्रॅटिक पक्ष आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.