बीजिंग – पीटीआय
चीनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या नवीन नोंदणी आता खूपच कमी प्रमाणात होत आहेत. त्यामुळे वुहानमध्ये फक्त १० दिवसाच्या विक्रमी वेळेत उभारण्यात आलेले कोरोनाग्रस्तांच्यासाठीचे विशेष रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त १० दिवसात उभारलेले हे अत्याधुनिक रुग्णालय आता बंद करण्यात आले आहे. हुबेई प्रांतातल्या वुहान शहरात या रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेले देशभरातील आरोग्य कर्मचारीही आता आपापल्या ठिकाणी परतले आहेत. आपली मोहीम फत्ते करुन हे आरोग्य कर्मचारी पुन्हा मूळ ठिकाणी गेले आहेत. चीनच्या अधिकृत माध्यमातून ही बातमी दिली आहे. आज बुधवारी हे रुग्णालय पूर्णपणे बंद करण्यात आले.
हे कोरोनाच्या संकटात उभारलेल्या दोन १००० बेडच्या रुग्णालयापैकी एक होते. फेब्रुवारी महिन्यात फक्त १० दिवसात हे रुग्णालय उभारण्यात आले होते. या दोन रुग्णालयांबरोबरच चीनमध्ये १४ आरोग्य सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच कोरोनाग्रस्तांच्यावर उपचार सुरू होते. ही सर्व केंद्रे नुकतीच बंद करण्यात आली आहेत.
हुबेई प्रांतात पाठवण्यात आलेल्या शेवटचा आरोग्य कर्मचारी गटही आता वुहानमधून बाहेर पडला आहे. चायना डेली या सरकारी वृत्तपत्रात ही बातमी देण्यात आली आहे. हुबेई प्रांतात चीनने ४२,००० आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. पहिल्यांदा जेव्हा वुहानमध्ये कोरोनाची लागण झाली तेव्हाच हे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी वुहानमध्ये २३ जानेवारीलाच लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा लॉकडाऊन ८ एप्रिलला उठवण्यात आला. या महामारीत ३००० आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली.
मंगळवारी वुहानमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे हे रुग्णालय बंद करण्यात आले. असे असले तरी हुबेई प्रांतात कोरोनाने आणखी एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकट्या हुबेई प्रांतात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३२२२ झाली आहे. कोरोनाचे कोणतेही लक्षण नसेल्या ३२ कोरोनाग्रस्तांची नोंद मंगळवारी हुबेईमध्ये झाली आहे. त्या सर्वांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.