भारताकडून सातत्याने पाकिस्तानवर हवाई हल्ले सुरू आहेत. यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता जगासमोर हात पसरले आहेत. या संदर्भात पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागाने अधिकृत (X) एक्स पोस्ट केली आहे.
पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, " शत्रूकडून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्जासाठी मदत मागितली आहे. वाढत्या युद्धपरिस्थिती आणि शेअर बाजारातील घसरण यामध्ये, आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांना तणाव कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो. राष्ट्राला स्थिर आणि खंबीर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे".
गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय भागीदारांना अधिक कर्जासाठी आवाहन करणारी पाकिस्तान मंत्रालयाची पोस्ट व्हायरल झाली. यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने त्यांचे एक्स अकाउंट हॅक करण्यात आल्याचे सांगितले.
भारताकडून आधी 'ऑपरेशन सिंदूर' आणि त्यापाठोपाठ केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. एकीकडे गृहकलह, दुसरीकडे भारताचा भीषण हल्ला आणि ढासळलेली अर्थव्यवस्था अशा कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने विद्यमान लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पदावरून हटविले आहे. पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी (दि.८) रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून हे हल्ले हाणून पाडले.