Batman सध्या अमेरिकेमध्ये फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या कारवायांमुळे जनतेत असंतोष आहे. ट्रम्प प्रशासनाचा विरोध करण्यासाठी लोक त्यांचे पुतळे जाळत आहेत. निदर्शने सुर आहेत. अनेक सेलिब्रेटी नाराजी व्यक्त करत आहेत. आता कॅलिफोर्निया शहराच्या सिटी कॉन्सिल मध्ये सुपरहिरो ‘बॅटमॅन’ ने एन्ट्री घेतली व थेट कॉन्सिलच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डीसी चा सुपरहिरो जसे गोथम सिटी वाचवण्यासाठी प्रयत्न करतो तशाच पद्धतीने या बॅटमॅनचे आंदोलन व्हायरल होत आहेत.
कॅलिफोर्नियातील सँटा क्लारा सिटी कॉन्सिलच्या बैठकीत मंगळवारी (२७ जानेवारी २०२६) हा प्रकार घडला. 'बॅट मॅन'च्या वेशभूषेत आलेल्या एका नागरिकाने सिटी कॉन्सिलच्या सदस्यांना धारेवर धरत, आगामी National Football League मधील 'सुपर बाऊल' (Super Bowl) स्पर्धेदरम्यान फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या (ICE) हस्तक्षेपावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
सिटी कॉन्सिलच्या सार्वजनिक टिप्पणीच्या (Public Comment) सत्रात हा नागरिक व्यासपीठावर आला. त्याने माईकसमोर येताच जोरात टेबलावर हात आपटला आणि "आपण इथे काय करत आहोत?" असा सवाल करत भाषणाला सुरुवात केली. त्याने सिटी कॉन्सिलच्या सदस्यांना 'भित्रे' आणि 'देशद्रोही’ असे म्हटले. त्याने आरोप केला की, प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा फेडरल दबावाला जास्त महत्त्व देत आहे.
नेमकी मागणी काय?
फेब्रुवारी महिन्यात सँटा क्लारा येथील लेव्हीज स्टेडियमवर होणाऱ्या 'सुपर बाऊल' या फूटबॉल महाअंतिम सामन्यादरम्यान ICE (Immigration and Customs Enforcement) अधिकाऱ्यांकडून गस्त घातली जाण्याची शक्यता आहे. याला विरोध करण्यासाठी या 'बॅट मॅन'ने थेट कॉन्सिलची सभा गाठली. स्थानिक प्रशासनाने ICE ला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करू नये. शहराची कोणतीही संसाधने इमिग्रेशन कारवाईसाठी वापरली जाऊ नयेत. असे त्या नागरिकाचे म्हणने होते मिनेसोटा येथे नुकत्याच झालेल्या निदर्शनांदरम्यान फेडरल एजंट्सच्या कारवाईत दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे.