बेळगाव : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मुळचे बेळगावचे असलेले सुपूत्र श्रीनिवास ठाणेदार यांनी अमेरिकेत निवडूण येत मराठीजणांची मान अभिमानाने उंचावली आहे. याचबरोबर महाराष्ट्राच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ६५ वर्षीय श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून विजय मिळवला आहे. एकूण मतांपैकी ९३ टक्के मतदारांचा कौल मिळवत सहा विरोधकांचा पराभव केला. श्री बेळगावात असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या श्रीनिवास ठाणेदार यांनी अतिशय कष्टाने शिक्षण घेत पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर ते १९७९ मध्ये करिअर घडवण्यासाठी ते अमेरिकेला गेले. १९८२ ते १९८४ दरम्यान त्यांनी पोस्ट-डॉक्टरल स्कॉलरशीप मिळवली. त्यानंतर ठाणेदार यांनी सेंट लुईस येथील पेट्रोलाईट कॉर्पोरेशनमध्ये पॉलिमर संशोधक म्हणून काम सुरू केले आहे.
ठाणेदार हे 65 वर्षीय यशस्वी उद्योजक असून त्यांनी त्यांच्या विरोधातील सहा उमेदवारांचा तब्बल 93 टक्के मते घेऊन पराभव केला. डेमॉक्रॅटिक पक्षाचे निष्ठावंत कायकर्ते असलेले ठाणेदार यांनी दोन वर्षापूर्वी 2018 मध्ये मिशिगन राज्याच्या गव्हर्नरपद निवडणुकीतही यश संपादन केले होते.
१९९० मध्ये केमीर ही तीन कर्मचारी असलेली कंपनी ताब्यात घेतली. आपल्या अंगभूत कौशल्यातून दीड लाख डॉलरच्या वार्षिक उलाढालीतून ६३ मिलियन डॉलरची वार्षिक यशस्वी उलाढाल ठाणेदार यांनी केली. ठाणेदार यांनी आतापर्यंत आठ विविध उद्योग खरेदी अथवा विक्री केले आहेत. कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या कंपनीला उर्जितावस्था देण्याचे अंगभूत कौशल्य त्यांच्यात आहे.
शहापूर येथील मीरापूर गल्लीतील ठाणेदार कुटुंबातील सहा भावंडामधील ते एक सदस्य. घरची आर्थिक स्थिती अडचणीची असूनही आई सुलोचना यांनी त्यांना शिक्षणासाठी उद्युक्त केले. दहावीमध्ये चिंतामणराव हायस्कूल येथे शिकत असताना त्यांनी केवळ ५५ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांना अवघ्या १८ व्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विजापुरात नोकरी लागली.
मात्र, त्यांना एमएस्सी पूर्ण करायची होती. धारवाड येथे प्राचार्यांनी त्यांना परवारनगी नाकारली. त्यानंतर ते धारवाड विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटले आणि त्यांना अखेर परवानगी मिळाली. पण, बँकेने त्यांना परीक्षेसाठी १५ दिवसांची रजा नाकारली. त्यानंतर त्यांनी येथील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आठ दिवस रोज एक तास झोपून अभ्यास केला. ठाणेदार यांचे 'ही श्रींची इच्छा' हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.