ढाका ः बांगला देशातील लक्ष्मीपूर सदर येथे शुक्रवारी उशिरा रात्री काही उपद्रवी घटकांनी एका घराला बाहेरून कडी लावून पेट्रोल ओतून आग लावली. या आगीत 7 वर्षांच्या चिमुरडीचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीररीत्या भाजले आहेत. हे घर बांगला देश नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेते बिलाल हुसेन यांचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री साधारण 1 च्या सुमारास घडली. आगीत बिलाल यांची 7 वर्षांची मुलगी आयशा अख्तर हिचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात बिलाल हुसेन आणि त्यांच्या दोन मुली सलमा अख्तर (16) व सामिया अख्तर (14) गंभीर जखमी झाले आहेत. बिलाल यांच्यावर लक्ष्मीपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत ढाका येथे हलवण्यात आले आहे.
मुलींची प्रकृती चिंताजनक
लक्ष्मीपूर सदर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूप पाल यांनी सांगितले की, दोन्ही मुलींचे शरीर सुमारे 50 ते 60 टक्के भाजले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ढाका येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये संदर्भांकित करण्यात आले आहे.