Bangladesh Violence | बांगला देशात जाळपोळ सुरूच; परराष्ट्र राज्यमंत्र्यांचे घर पेट्रोल बॉम्ब फेकून पेटवले 
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Violence | बांगला देशात जाळपोळ सुरूच; परराष्ट्र राज्यमंत्र्यांचे घर पेट्रोल बॉम्ब फेकून पेटवले

हिंसाचाराचा वणवा

पुढारी वृत्तसेवा

ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशात राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले असून देशातील अनेक भागांत जाळपोळ, तोडफोड आणि हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी बांगला देशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायून कबीर यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब फेकून आग लावण्यात आली. यावेळी कबीर घरी उपस्थित नव्हते. हल्ल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, गुरुवारी आंदोलकांनी मोहम्मद युनूस यांच्या घरालाही आग लावली होती.

शेख हसिना, अवामी लीग पक्षावर आरोप

कबीर यांनी या हल्ल्यामागे हसीना यांच्या अवामी लीगचा हात असल्याचा आरोप केला. त्यांनी अवामी लीगला दहशतवादी संघटना संबोधले. हिंसाचार करून दिल्लीतील कोणत्याही फरार व्यक्तीला व्यावसायिक विमानाने बांगला देशात आणता येणार नाही. शेख हसीना यांच्या परताव्यासाठी भारत आणि बांगला देश यांच्यातील प्रत्यार्पण कराराचाच मार्ग स्वीकारावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हल्लेखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला.

हसीना यांच्यावर पंतप्रधानांचा निशाणा

बांगला देशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनीही अवामी लीगवर देशात हिंसाचार घडवून आणण्याचा आणि कटकारस्थान रचण्याचा आरोप केला आहे. गुरुवारी एका सभेत बोलताना ते म्हणाले की, १६ वर्षे जबरदस्तीने सत्तेत राहिल्यानंतर देश सोडून गेलेले लोक आता सीमापारून बांगला देशविरोधात कट रचत आहेत. ज्या देशात त्यांनी आश्रय घेतला आहे, तेथील आपल्या आकांना खूश करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख भारताकडे असल्याचे मानले जात आहे.

बंददरम्यान जाळपोळ आणि तोडफोड

शेख हसीना यांच्या अवामी लीगने १९ नोव्हेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली होती. हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या मागणीसाठी पक्षाने आंदोलन सुरू केले होते. या बंददरम्यान दक्षिण बांगला देशातील अनेक जिल्ह्यांत हिंसाचार झाला. बॉर्डर गार्ड बांगला देशच्या ९७ तुकड्या सात जिल्ह्यांत तैनात केल्या आहेत. ढाक्यात अवामी लीगशी संबंध असल्याच्या संशयावरून २४ तासांत १०७ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांचाही समावेश आहे.

हसीना मायदेशी परतण्याच्या घोषणेने तणाव

हसीना यांनी डिसेंबर २०२६ मध्ये बांगला देशात परतण्याची आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीमुळे भारत-बांगला देश संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र, अद्याप त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही.

भारताची सावध भूमिका

नवी दिल्ली : बांगला देशातील वाढत्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने सावध भूमिका घेतली आहे. बांगला देशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीग पक्षावर केलेल्या आरोपांबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट भाष्य करण्यास नकार दिला; मात्र भारताला बांगला देशसोबत सकारात्मक, रचनात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण संबंध ठेवायचे असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, ‘भारत आणि बांगला देश यांच्यातील संबंध दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासावर आणि जनतेमधील सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहेत. बांगला देशसोबत सकारात्मक आणि रचनात्मक संबंध ठेवण्याची भारताची इच्छा कायम आहे; मात्र बांगला देशातील अंतर्गत घडामोडींवर मला कोणतीही टिप्पणी करायची नाही.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT