ढाका; वृत्तसंस्था : शरीफ ओसमान हादी यांच्या दफनविधीनंतर शनिवारी बांगला देशात तणाव अधिक वाढला आहे. हादी यांच्या समर्थकांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला इशारा दिला असून, त्यांच्या हत्येतील सर्व आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्याची मागणी केली आहे.
ही मागणी पूर्ण न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडण्याची धमकी समर्थकांनी दिली आहे. समर्थकांच्या मते, अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर आता त्यांच्या संयमाचा अंत झाला आहे. जर 24 तासांच्या आत सर्व मारेकर्यांना अटक झाली नाही, तर मोठे आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा हादींच्या समर्थकांनी दिला आहे.
हादी यांच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना (जनाझा) शनिवारी दुपारी ढाका येथे पार पडली. इन्किलाब मंचच्या या संयोजकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. कुटुंबाच्या इच्छेनुसार, हादी यांचा दफनविधी राष्ट्रीय कवी काझी नझरुल इस्लाम यांच्या थडग्याजवळ करण्यात आला. सकाळपासूनच माणिक मिया अॅव्हेन्यूवर शोककर्त्यांची गर्दी जमू लागली होती. संसदेसमोरील रस्ता लोकांनी पूर्णपणे भरून गेला होता. उपस्थित जमावातील काहींनी स्वतःला राष्ट्रध्वजात लपेटले होते, तर काहीजण हादींच्या हत्येच्या निषेध करणार्या घोषणा देत होते.