ढाका : हिंसाचारादरम्यान येथील हिंदू नागरिकांच्या घरांवर हल्ले करून समाजकंटक जाळपोळ करत असल्याचे द़ृश्य.  Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Protest News | बांगला देशात हिंसाचारात हिंदूंवर हल्ले, २७ जिल्ह्यांत जाळपोळ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगला देशात नव्याने हिंसाचार भडकला (Bangladesh Protest News) असून या हिंसाचारात आता थेट हिंदूंनाच टार्गेट करण्यात येत आहे. बांगला देशातील 27 जिल्ह्यांतील हिंदू नागरिकांंवर हल्ले करण्यात येऊन त्यांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या आहेत. बांगला देशात निर्माण झालेल्या अराजकात आगामी काळात हिंदूंनाच लक्ष्य केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनांनंतर भारत सतर्क झाला आहे. बांगला देशातील घडामोडींवर भारत बारीक लक्ष ठेवत असून तेथील स्थिती चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. दुसरीकडे, शेख हसीना यांच्या गच्छंतीनंतर बांगला देशात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. कैदेत असलेल्या विरोधी पक्षनेत्या बेगम खालिदा यांची तुरुंगातून तत्काळ सुटका करण्यात आली तर तेथील राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली.

जमाते-ए-इस्लामीमुळे धोका

शेख हसीना व त्यांचा पक्ष सत्तेतून पायउतार झाल्यावर बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांचे वर्चस्व वाढणार असून त्यामुळे बांगला देशातील हिंदूंवर आगामी काळात संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. परिणामी भारतात बांगला देशी हिंदूंचा लोंढा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी इशारा दिला आहे की, बांगला देशातील हिंसाचारामुळे तेथील एक कोटी हिंदू भारतात आश्रयाला येऊ शकतात.

या सार्‍या घडामोडींमुळे भारत सतर्क झाला असून संसदेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या निवेदनातही या विषयावर त्यांनी भाष्य केले आहेत. जयशंकर म्हणाले की, बांगला देशात हिंदूंना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आम्ही सतर्क आहोत. तेथील हिंदूंच्या सुरक्षेबाबतीत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहोत. काही भागांत स्थानिक बहुसंख्याकांनी या हिंदूंचे रक्षण करण्यासाठी उपाय योजले आहेत. त्याचे आम्ही स्वागत करतो. पण तेथे कायदा व सुव्यवस्था स्थापित होईपर्यंत आम्ही चिंतीत आहोत.

संसदेत उच्चस्तरीय बैठक

बांगला देशात परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवर हल्ले होत आहेत, हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली जात आहेत. बांगला देशातील परिस्थितीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात संसद भवनात उच्चस्तरीय बैठक झाली. संसद भवनात झालेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. बांगला देशच्या मुद्द्यावर सुमारे 20 मिनिटे ही बैठक झाली.

Bangladesh Protest News : संसद बरखास्तीची घोषणा

बांगला देशात राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांनी सोमवारी संसद बरखास्त करण्याची घोषणा केली. आंदोलक विद्यार्थ्यांची ही प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आता अंतरिम सरकारला आगामी 90 दिवसांत बांगला देशात संसदीय निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

खालिदा झिया यांची सुटका

शेख हसीना यांनी तुरुंगात टाकलेल्या बांगला देश नॅशनल पार्टीच्या नेत्या बेगम खालिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश सोमवारी रात्री राष्ट्रपतींनी जारी केले. त्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली. अंतरिम सरकारमध्ये बीएनपी पक्षाची मोठी भूमिका राहाणार आहे.

हिंदूंची 12 घरे, दोन मजली इमारती पेटवल्या

बांगला देशात हिंदू आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्याचे केंद्र बनत आहेत. हिंदूंच्या व्यापारी प्रतिष्ठानांवर आणि मंदिरांवर हल्ले चढवले जात आहेत. बांगला देशमध्ये 27 जिल्ह्यांमध्ये हिंदू घरांना लक्ष्य करण्यात आले. हिंदू धार्मिक कार्याशी संबंधित प्रदीप चंद्र रॉय यांच्या घराची तोडफोड करून लूटमार करण्यात आली आहे. हातिबंधा जिल्ह्यात 12 हिंदूंची घरे पेटवली. खानसामा जिल्ह्यात तीन हिंदूंच्या घरावर हल्ला करण्यात आला. पंचगढमध्ये अनेक हिंदू घरांवर हल्ले करण्यात आले. लक्ष्मीपूरमध्ये हिंदूंच्या दोन मजली इमारतीला आग लावण्यात आली आहे. याशिवाय बांगला देशमधील दिनाजपूर, शेरपूर, खुलना, फेनी, नरसिंगडी, लखीपूर, किशोरगंज, चट्टोग्राम, जशोर, सातखीरा, नरेल, हबीगंज, बोगुरा, पटुआखली, पंचगढ, मागुरा, मैमनसिंग, टांगैल, बागेरहाट, नौखाली या ठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT