Zahed ur Rahman file photo
आंतरराष्ट्रीय

Bangladesh: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या सल्लागाराला दिल्ली विमानतळावर २ तास रोखले; संतापून भारतात न उतरताच माघारी परतले

बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे धोरण आणि रणनीती सल्लागार झाहिद उर रहमान यांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तब्बल दोन तास तपासणीसाठी थांबवून ठेवले.

मोहन कारंडे

India Bangladesh relations Zahed ur Rahman Delhi airport

नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे धोरण आणि रणनीती सल्लागार झाहिद उर रहमान यांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तब्बल दोन तास तपासणीसाठी थांबवून ठेवले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या झाहिद यांनी भारतात प्रवेश न करताच रविवारी रात्री कोलंबोमार्गे ढाका गाठले. भारतावर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना विमानतळावर रोखण्यात आल्याचे समजते. या घटनेवर बांगलादेश सरकारने तीव्र आक्षेप घेतला असून ढाका येथे भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना समन्स बजावून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे 'वॉचलिस्ट'मध्ये नाव

झाहिद उर रहमान हे रविवारी संध्याकाळी 'इंडियन ओशन रिम असोसिएशन'च्या बैठकीत बांगलादेशच्या अधिकृत शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यांच्याकडे सामान्य बांगलादेशी पासपोर्ट आणि 'सार्क' व्हिसा होता. मात्र, त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून त्यांनी यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, तसेच भारतातून बांगलादेश अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. या भारतविरोधी वक्तव्यांमुळे त्यांचे नाव इमिग्रेशनच्या 'वॉचलिस्ट'मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

प्रवेशाची सवलत नाकारली

इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर झाहिद यांना भारतात प्रवेश करण्यासाठी विशेष एकवेळची सवलत दिली होती. अधिकृत सूत्रांनुसार, अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश करण्याची विनंतीही केली, परंतु सार्वजनिक ठिकाणी दोन तास ताटकळत ठेवल्यामुळे संतापलेल्या झाहिद यांनी भारतात पाय ठेवण्यास नकार दिला आणि तेथूनच परतीचा प्रवास पकडला.

बांगलादेशने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बजावले समन्स

या घटनेचे बांगलादेशात तीव्र पडसाद उमटले आहेत. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलिलुर रहमान यांनी ही घटना 'अपेक्षित नसलेली आणि दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील भारताचे प्रभारी राजनैतिक अधिकारी पवन बाधे यांना तात्काळ बोलावून या संपूर्ण प्रकाराबद्दल 'तीव्र नाराजी' व्यक्त केली.

द्विपक्षीय संबंधांवर सावट

बांगलादेशात तारिक रहमान यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बांगलादेशची पाकिस्तानसोबत वाढणारी जवळीक आणि चीनकडे असलेला कल यामुळे दोन्ही देशांमध्ये आधीच अविश्वासाचे वातावरण आहे. त्यातच घडलेल्या या नव्या वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झाहिद यांना घेण्यासाठी बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला स्वतः विमानतळावर उपस्थित होते. बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी सांगितले की, "ही घटना निश्चितच स्वागतार्ह नाही. आमचे मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत असून भारताशी संपर्क साधला जात आहे. संपूर्ण तपशील समोर आल्यानंतर योग्य ती पावले उचलली जातील." दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT