BNP's Mirza Fakhrul Islam Alamgir elected as 23rd President of Bangladesh
ढाका : बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची गुरुवारी बांगला देशच्या नव्या राष्ट्रपतिपदी निवड झाली. तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती पदासाठी झालेल्या पहिल्या लढतीत आलमगीर यांनी प्रतिस्पर्धी कर्नल (निवृत्त) ओली अहमद यांचा पराभव केला. राष्ट्रपतीपदासाठी गुरुवारी मतदान पार पडले. आलमगीर यांचा शपथविधी शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
७८ वर्षीय आलमगीर हे सत्ताधारी बीएनपीचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष तसेच जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील ११ पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल (निवृत्त) ओली अहमद मैदानात होते.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी एएमएम नासिरुद्दीन यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांना २५५ खासदारांची मते मिळाली, तर ओली अहमद यांना ८८ खासदारांनी मते दिली.
आलमगीर यांनी स्पष्ट आघाडी मिळवत विजय नोंदवला. बांगलादेशच्या राजकारणात बीएनपीचे महत्त्वाचे नेते म्हणून आलमगीर यांची ओळख आहे. ३५ वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रपतीपदासाठी झालेली ही निवडणूक बांगलादेशच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
विरोधी आघाडीनेही आपला उमेदवार मैदानात उतरवल्याने यंदाची निवडणूक विशेष चर्चेत राहिली.