J-10CE Fighter Jet | बांगला देश खरेदी करणार चिनी विमाने; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकने वापरलेल्या विमानांची निवड  
आंतरराष्ट्रीय

J-10CE Fighter Jet | बांगला देश खरेदी करणार चिनी विमाने; ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकने वापरलेल्या विमानांची निवड

पुढारी वृत्तसेवा

ढाका/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : बांगला देशने आपल्या हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी चीनकडून २४ अत्याधुनिक जे-१० सीई लढाऊ विमाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने भारताविरोधात वापरलेल्या याच प्रकारच्या विमानांची निवड बांगला देशने केली आहे. ढाकास्थित माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यादरम्यान या खरेदी प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत खरेदी करारावर स्वाक्षरी होऊ शकते.

जे-१०सीई हे चीनच्या चेंगडू जे-१०सी या ४.५ पिढीतील बहुउद्देशीय लढाऊ विमानाचे निर्यात संस्करण आहे. अत्याधुनिक एईएसए रडार, दीर्घ पल्ल्याची पीएल-१५ क्षेपणास्त्रे, उच्च वेग आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली यामुळे हे विमान चीनच्या सर्वाधिक सक्षम निर्यात लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. सध्या बांगलादेश हवाई दलाकडे प्रामुख्याने जुन्या एफ-७ आणि मिग-२९ प्रकारच्या सुमारे ४० ते ४४ विमानांचा ताफा आहे. नवीन विमानांच्या समावेशामुळे त्यांची हवाई क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. २००९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘फोर्सेस गोल २०३०’ या संरक्षण आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत बांगलादेशने आधीच रणगाडे, युद्धनौका, पाणबुड्या आणि इतर लष्करी उपकरणांची खरेदी केली आहे. या प्रक्रियेत चीन हा प्रमुख पुरवठादार बनला आहे.

भारतासाठी नेमका धोका किती?

भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडकडे सुखोई-३० एमकेआय आणि राफेलसारखी अत्याधुनिक विमाने असून त्यांची संख्या आणि क्षमता बांगला देशपेक्षा अधिक आहे.

भारतीय सीमेजवळ हवाई तळ

बांगला देश भारताच्या सीमेलगत असलेल्या लालमोनिरहाट येथील दुसऱ्या महायुद्धकालीन हवाई तळाचे आधुनिकीकरणही करीत आहे. हा तळ भारतीय सीमारेषेपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे नवीन हँगर, दुरुस्ती सुविधा आणि प्रगत रडार यंत्रणा उभारल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT