ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. पंतप्रधान अँथोनी अल्बानिस यांनी १४ ते १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यास बंदी घालण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियावर वेळ घालवण्या ऐवजी स्विमिंग पूल आणि टेनिस कोर्टसारख्या मैदानी खेळांवर वेळ घालविण्याची गरज असल्याचे मत अल्बानिस यांनी व्यक्त केले.
मुलांच्या वयाची पडताळणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नव्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू आहे.
१६ वर्षांखालील मुलांनी मैदानी खेळामध्ये भाग घ्यावा, यासाठी प्रस्तावित कायद्यावर विचार सुरू आहे. मध्यवर्ती सभागृहात या वर्षअखेर नवीन कायदा मंजूर करण्यात येणार आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉकसह अन्य वेबसाईटवर खाते उघडण्याचे मुलांचे वय किती असावे, याबाबतचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारच्या नव्या कायद्यास पाठिंबा देण्याचा निर्णय विरोधी पक्षांनीही घेतला आहे.
१४ ते १६ वर्षांखालील मुलांना यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान अँथोनी यांनी १६ वर्षांखालील वापरकर्त्यांची खाती ब्लॉक करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सोशल मीडियाशी संबंधित कंपन्यांनी यावर अद्याप भाष्य केलेले नाही. त्यातून मुलांना ज्ञानही मिळत असल्याने आयटी क्षेत्रातील सोशल मीडियामुळे अनेक मुलांना मानसिक समस्या उद्भवत आहेत.
तज्ज्ञांनी नव्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.