Pakistan Army | पाकिस्तानी लष्कर चौक्‍या सोडून पळाले!  File Photo
आंतरराष्ट्रीय

Pakistan Army | पाकिस्तानी लष्कर चौक्‍या सोडून पळाले!

बलूच बंडखोरांनी बुलडोझर चालवून ड्युरंड लाईनवरील ठाणी केली उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्‍था : पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रांतात बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराला सळो की पळो करून सोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराला ड्युरंड लाईनवरील अनेक चौक्या सोडून माघार घ्यावी लागली आहे. बलूच बंडखोरांनी या चौक्या बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्या आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये बलूच बंडखोर पाकिस्तानी लष्कराची एक चौकी पाडताना स्पष्ट दिसत आहेत.

बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारचे प्रतिनिधित्व करणारे मीर यार बलूच यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर दोन व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, बलुचिस्तान प्रजासत्ताकच्या संरक्षण व सुरक्षा दलांकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानी लष्कराने ड्युरंड लाईनजवळील आपल्या काही चौक्या सोडल्याचे वृत्त आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ही घटना बलुचिस्तानमध्ये ड्युरंड लाईनवरील जाबुल प्रांतातील शमलजई जिल्ह्यातील सर जंगल परिसरातील गेट चौकी येथे घडली आहे. बलूच दल आता पाकिस्तानी लष्कराने सोडलेल्या चौक्या हटवत असून त्या जागी बलुचिस्तान प्रजासत्ताकच्या अधिकाराखालील सीमा चौक्या (बॉर्डर पोस्ट) उभारल्या जात आहेत.

बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन शेजारी आणि भावासारखे देश आहेत, ज्यांच्यात दीर्घकाळापासून ऐतिहासिक, सांस्कृतिक व बंधुत्वाचे संबंध आहेत. कोणताही देश दुसऱ्यासाठी धोका नाही. भविष्यात बलुचिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात सीमा सुरक्षेसाठी एक संयुक्त यंत्रणा (सिस्टीम) बनण्याची शक्यता आहे. सीमेवरील गस्तीमध्ये समन्वय साधणे, प्रादेशिक सहकार्य बळकट करणे आणि पाकिस्तान व त्यांच्या समर्थित घटकांची घुसखोरी रोखणे हा यामागचा उद्देश असेल, जेणेकरून दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता, स्थैर्य आणि सुरक्षा राहील.

जनतेनेच घेतली स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी

बलुचिस्तानमधील परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराला कंटाळून जनतेने आता स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच हाती घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला बलुचिस्तानमध्ये अनेक ठिकाणी तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT