Baloch Liberation Army: बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सुरक्षा दल आणि लष्करावर झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण हल्ल्यांची जबाबदारी घेत बलोच लिबरेशन आर्मी (BLA) या फुटीरतावादी संघटनेने एक मोठा दावा केला आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या या दोन्ही हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे तब्बल २५ जवान मारले गेल्याचे बीएलएने म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून किंवा कोणत्याही स्वतंत्र स्त्रोताकडून या जीवितहानीची अजूनही पुष्टी करण्यात आलेली नाही.
बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, पहिला हल्ला जियारत क्रॉसजवळ करण्यात आला, ज्यामध्ये सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. संघटनेच्या लढाऊ पथकाने ताफ्यातील दोन वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि या कारवाईत १८ सुरक्षाकर्मी ठार झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यादरम्यान पाच जखमी जवान घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर हल्लेखोरांनी जवानांची शस्त्रे देखील आपल्या ताब्यात घेतली. या हल्ल्यात बीएलएच्या विशेष 'फतेह स्क्वॉड'ने सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरा हल्ला सुरब परिसरातील हाजीका भागात झाला, जिथे बीएलएच्या एसटीओएस (STOS) पथकाने रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने एका वाहनावर स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात आणखी सात सुरक्षाकर्मींचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बलुचिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, यापूर्वी ऑगस्ट २०२६ मध्येही बीएलएने अनेक समन्वित हल्ले करून सुरक्षा दलांचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला होता.