बलूच आर्मीने घडविलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या स्फोटात पाकच्या 12 सैनिकांचा मृत्यू झाला.  Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Baloch Liberation Army : बलूच लिबरेशन आर्मीचे 39 ठिकाणी हल्ले

पाकिस्तानच्या 12 सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

क्वेट्टा; वृत्तसंस्था : पाकिस्तानला एकीकडे भारताकडून चारीमुंड्या चीत व्हावे लागत असताना त्यातच बलुचिस्तान प्रांतातील बलूच मुक्ती संघटनेने (बीएलए) देखील चोहो बाजूंनी घेरण्यास सुरुवात केली असून 39 ठिकाणी हल्ले करत पाकिस्तानची जबरदस्त कोंडी केली आहे. पाकिस्तान सातत्याने भारतीय सीमारेषेवर ड्रोन हल्ले करत असला तरी भारतीय सैन्याने त्याचा चोख समाचार घेण्यात अजिबात कसर सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर आधीच हैराण झालेल्या पाकिस्तानच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. शनिवारी बलूच आर्मीने घडविलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या स्फोटात पाकच्या 12 सैनिकांचा मृत्यू झाला.

बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, बीएलएने बलुचिस्तान प्रांतातील 39 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले चढवले आहेत. आमची ही मोहीम अद्याप सुरू असून यात महामार्गासह पाकिस्तानातील पोलिस ठाणी, पाकिस्तानी सैन्य तळ आणि त्यांची शस्त्रास्त्रे मुख्य लक्ष्य आहे, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापुढेही आमचे हल्ले आणखी व्यापक पद्धतीने होत राहतील आणि आम्ही वेळोवेळी त्याची माहिती देत राहू, याचाही यात उल्लेख आहे.

मागील तीन दिवसांच्या कालावधीत बीएलएने पाकिस्तानच्या बलूच प्रांतात सातत्याने आक्रमक हल्ले चढवले असून यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले आहे. 7 मे रोजी बोलन येथील मच-कच्छ जिल्ह्यात बीएलएने पाकिस्तानच्या एका सैन्य पथकावर रिमोट नियंत्रित आयईडी हल्ला केला असून त्यात 12 सैनिक मारले गेल्याचा त्यांचा दावा आहे. विशेष मोहिमेतील कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारुक यांचाही यात समावेश असल्याचे बीएलएने यावेळी म्हटले. याशिवाय 8 मे रोजी देखील क्वेट्टात बीएलएने एकूण 6 हल्ले करत अनेक सैन्य तळ आणि सुरक्षा तपासणी नाके उद्ध्वस्त केले. बलूच जनतेवर होत असलेल्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी आम्ही हे हल्ले करत आहोत, असे बीएलएने यावेळी स्पष्टपणे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT