आंतरराष्ट्रीय

Ayatollah Ali Khamenei : खामेनेईंच्या मृत्यूनंतर यूपीच्या गावात शोककळा, काय आहे खामेनेईंचं ‘भारत कनेक्शन’?

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातमीने सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र, मध्यपूर्वेतील या घटनेमुळे भारतातील एका गावात शोककळा पसरली आहे.

पुढारी वृत्तसेवा

बाराबंकी/नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातमीने सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र, मध्यपूर्वेतील या घटनेमुळे भारतातील एका गावात शोककळा पसरली आहे. हे गाव म्हणजे उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील 'किंतूर' गाव.

इराणचे नेते खामेनेई यांचा किंवा त्यांच्या पूर्वजांचा भारतातल्या किंतूर गावाशी काहीच थेट संबंध नाही. मात्र खामेनेई यांचे गुरु अयातुल्ला रुहुल्ला खुमैनी यांचे या गावाशी अत्यंत जुने आणि ऐतिहासिक नाते आहे. १९७९ साली इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीचे नेतृत्व अयातुल्ला रुहुल्ला खुमैनी यांनी केले होते. हेच खुमैनी अयातुल्ला अली खामेनेई यांचे गुरु होते. खुमैनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हे मूळचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सिरौलीगौसपूर तालुक्यातील 'किंतूर' गावचे रहिवासी होते. त्यांचा जन्म याच गावात झाला होता. त्यांचे वंशज अजूनही त्या गावात राहतात.

खुमैनींचे आजोबा मूळ भारतीय

स्थानिक इतिहास आणि वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अहमद मुसावी हे १८३०-३४ च्या सुमारास वयाच्या ४० व्या वर्षी धार्मिक यात्रेसाठी इराकला गेले. त्यानंतर ते इराणमध्ये पोहोचले आणि तिथे 'खुमैन' नावाच्या शहरात स्थायिक झाले. विशेष म्हणजे, मातृभूमीशी असलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही; इराणमध्ये गेल्यावरही त्यांनी आपल्या नावापुढे 'हिंदी' हे उपनाव जोडले होते आणि लोक त्यांना 'सय्यद अहमद मुसावी हिंदी' या नावाने ओळखत असत.

पुढे याच कुटुंबात अयातुल्ला रुहुल्ला खुमैनी यांचा जन्म झाला, ज्यांनी इराणची सत्ता उलथवून लावत इस्लामिक क्रांती घडवून आणली. अली खामेनेई हे खुमैनी यांचे अत्यंत जवळचे शिष्य मानले जात. खुमैनी यांच्या निधनानंतर खामेनेई यांनीच त्यांची विचारधारा पुढे नेली आणि इराणचे सर्वोच्च नेते म्हणून धुरा सांभाळली.

किंतूर गावावर शोककळा

या ऐतिहासिक आणि भावनिक ऋणानुबंधामुळे खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच किंतूर आणि आसपासच्या भागात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. खामेनेई यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावात ठिकठिकाणी लोक एकत्र आले. या दिवंगत नेत्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विशेष प्रार्थना (दुआ फातिहा) आणि शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT