King Charles Australia tour : ब्रिटनचे किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला यांनी आज (दि.२१) ऑस्‍ट्रेलियाच्‍या संसद भवनाच्या ग्रेट हॉलमध्ये ऑस्ट्रेलियन खासदार आणि सिनेटर्सना संबोधित केले. दुसर्‍या छायाचित्रात किंग चार्ल्स यांचा निषेध करणार्‍या महिला खासदार लिडिथा थॉर्प यांना हॉल बाहेर काढताना सुरक्षा रक्षक.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

"तू आमचा राजा नाहीस..." : किंग चार्ल्स यांच्‍यासोबत ऑस्‍ट्रेलियात नेमकं काय घडलं?

King Charles Australia tour : संसद भवनाच्या ग्रेट हॉलमध्ये महिला खासदाराचा आक्रमक पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकेकाळी ब्रिटीश साम्रज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, असे म्हटले जाई. याचा अर्थ इतकाच की, संपूर्ण जगभर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती करून ठेवल्या होत्या. त्‍यामुळेच 'जगाचे सम्राट' असे बिरुदही ब्रिटीश राजघराण्‍याने १९ व्‍या शतकात मिरवलं. मात्र याच वसाहतवादावरुन ब्रिटीश राजघराण्‍याचे किंग चार्ल्स यांना ऑस्‍ट्रेलियात दौर्‍यात अपक्ष खासदारांच्‍या रोषाला सामोरे जावे लागले. ( King Charles Australia tour) जाणून घेवूया प्रिन्स चार्ल्स यांच्‍यासोबत ऑस्‍ट्रेलियात नेमकं काय घडलं याविषयी....

ऑस्‍ट्रेलियाच्‍या संसद भवनात अपक्ष खासदाराचा आक्रमक पवित्रा

ब्रिटनचे किंग चार्ल्स आणि राणी कॅमिला सध्या पाच दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. किंग चार्ल्स यांनी आज (दि.२१) ऑस्‍ट्रेलियाची राजधानी‍ कॅनबेरा येथील संसद भवनाच्या ग्रेट हॉलमध्ये ऑस्ट्रेलियन खासदार आणि सिनेटर्सना संबोधित केले. यानंतर अपक्ष महिला खासदार लिडिथा थॉर्प यांनी अचानक "तू आमचा राजा नाहीस..." अशी घोषणा देण्‍यास सूरुवात केली. कार्यक्रमाला उपस्‍थित असणार्‍या श्रोत्यांच्या पाठीमागे येऊन थॉर्प यांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्‍यांनी घेतलेल्‍या आक्रमक पवित्रा पाहून उपस्‍थित काही क्षण गोंधळले. कार्यकमस्‍थळी काही काळ गोंधळही झाला. ( King Charles Australia tour)

आमच्‍याकडून जे काही चोरले ते आम्हाला परत द्या..

यावेळी अपक्ष खासदार लिडिथा थॉर्प यांनी दावा केला की, "ब्रिटीशांनी आमच्‍या लोकाचा नरसंहार केला. हा तुमचा देश नाही. तू आमचा राजा नाहीस. तू आमच्या लोकांवर नरसंहार केलास. आमची जमीन आम्हाला परत द्या. तुम्‍ही आमच्‍या पूर्वजांची हाडे, कवटी, आमची बाळं आणि जनता हे सर्व परत करा. तुम्‍ही आमच्‍याकडून जे काही चोरले ते आम्हाला परत द्या, अशी मागणीही त्‍यांनी जोरजोरात ओरडून केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या टिप्पण्यांमध्ये राजेशाहीला तीव्र विरोध आणि स्वदेशी हक्कांसाठी लढणार्‍या खासदार, अशी लिडिथा थॉर्प यांची प्रतिमा झाली आहे. तसेच थॉर्प यांनी व्‍यक्‍त केलेल्‍या निषेधावर टीकाही होत आहे. ऑस्‍ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट यांनी या प्रकाराला दुर्दैवी राजकीय प्रदर्शन म्‍हटले आहे.

King Charles Australia tour : ग्रेट हॉलमधून थॉर्प यांना बाहेर काढले

खासदार लिडिथा थॉर्प यांनी जोरदार घोषणाबाजी सूरु केल्‍यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्‍यांना हॉलच्या दरवाज्यापर्यंत नेले. थॉर्प यांना राजा चार्ल्सपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्‍यांना ग्रेह हॉलमधून बाहेर काढले.

King Charles Australia tour : किंग चार्ल्स आजही ऑस्ट्रेलियाचे सम्राट

ऑस्‍ट्रेलियात एकेकाळी १०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटीश वसाहत होती. त्या काळात हजारो आदिवासी ऑस्ट्रेलियन मारले गेले किंवा विस्थापित झाले होते. १९०१ मध्‍ये ऑस्‍ट्रेलियास स्वातंत्र्य मिळाले; पण आजही ते अद्याप पूर्ण प्रजासत्ताक नाही. घटनात्मक राजेशाही कायम आहे. १९९९ मध्‍ये ऑस्‍ट्रेलियातील नागरिकांनी बहुमताने राणी एलिझाबेथ द्वितीय यांना राज्य प्रमुख म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा निकाल बहुसंख्य राजाला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रपती निवडण्याच्या पद्धतीवरून झालेल्या मतभेदाचा परिणाम असल्याचे मानले जाते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर किंग चार्ल्स हे सध्याचे राज्य प्रमुख आहेत. ऑस्‍ट्रेलिया हा राष्‍ट्रकूल ( पूर्वी ब्रिटिश साम्राज्यात असलेल्या ५२ देशांची संघटना) संघटनेमधील देश आहे. ऑस्ट्रेलिया ही वसाहत नसलेली एकमेव माजी ब्रिटीश वसाहत आहे. आजही ऑस्‍ट्रेलियातील अनेक आदिवासी जमातींसह टोरेस स्ट्रेट आयलँडरचे नागरिक आपली जमनी जमीन राजसत्तेला दिलेली नाही, यावर ठाम आहेत.

किंग चार्ल्स यांचा ऑस्ट्रेलिया दौरा

किंग चार्ल्सची यांचा हा सतरावा ऑस्‍ट्रेलिया भेट आहे. तसेच २०२२ मध्‍ये ब्रिटीनचे राजे झाल्‍यानंतरचा त्‍यांचा हा पहिलचा दौरा आहे. २०११ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ऑस्‍ट्रेलियाचा दौरा केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT