Tuvalu First ATM Pudhari
आंतरराष्ट्रीय

केवळ 11000 लोकसंख्येच्या देशात प्रथमच सुरू झाले ATM

Tuvalu First ATM: सागरी संकटाच्या छायेत डिजिटल क्रांती

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी वाढत चालल्याने नेहमी चर्चेत येणारा देश म्हणजे तुवालू. पॅसिफिक महासागरातील हे बेट म्हणजे जगातील सर्वात लहान आणि दुर्गम देशांपैकी एक आहे.

तर या राष्ट्राने 15 एप्रिल रोजी देशात प्रथमच एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशिन) सुरू करण्यात आले. मुख्य बेट फुनाफुतीवर एका सार्वजनिक समारंभात हा उपक्रम झाला. The Guardian ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

5 एटीएम आणि 30 पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्स बसवले

ऑस्ट्रेलिया आणि हवाई दरम्यान पॅसिफिक महासागरात वसलेला तुवालू हा सुमारे 11000 लोकसंख्येचा देश आहे. केवळ 10 चौरस मैल आकारात विखुरलेले नऊ बेटांचे हे राष्ट्र आहे.

इतका लहान आकार व दूरवर असूनही, तुवालूने आर्थिक आधुनिकीकरणाच्या दिशेने धाडसी पाऊल टाकले आहे. फुनाफुती विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाच एटीएम्स बसवण्यात आले आहेत.

नॅशनल बँक ऑफ टुवालूने फिजीतील Pacific Technologies Limited या कंपनीच्या सहकार्याने अनेक वर्षांच्या तयारीनंतर एटीएम आणि पॉइंट-ऑफ-सेल प्रणाली विकसित करून अंमलात आणली.

हा प्रकल्प 2021 साली सुरू झाला होता आणि यासाठी 3 दशलक्ष डॉलरहून अधिक खर्च करण्यात आला होता. फुनाफुतीमध्ये पाच एटीएम्स आणि 30 पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्स बसवण्यात आले आहेत.

6000 हून अधिक बँक खाती

एटीएम्स सुरू होण्याआधी तुवालूमध्ये कोणत्याही प्रकारचे स्वयंचलित बँकिंग उपलब्ध नव्हते. सर्व व्यवहार हाताने केले जात असत. नागरिकांना पगार काढण्यासाठी किंवा इतर सेवा मिळवण्यासाठी अनेक तास रांगेत उभे राहावं लागत असे. बँकेचे वेळापत्रकही मर्यादित होते, आणि पगाराच्या दिवशी तर प्रचंड गर्दी होत असे.

सध्या देशात 6000 हून अधिक नोंदणीकृत बँक खाती आहेत आणि अनेक नागरिकांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत. त्यामुळे डिजिटल प्रणालीमुळे गर्दी कमी होणे, दुर्गम भागांमध्ये आर्थिक सेवा उपलब्ध होणे आणि रोख पैशांवरील अवलंबन कमी होणे अपेक्षित आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान फेलेती टेओ यांच्या हस्ते झाले. संसद सदस्य, नेते आणि गव्हर्नर जनरल यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या समारंभाला हजेरी लावली होती. पंतप्रधानांनी केक कापून आणि भाषण देऊन या ऐतिहासिक क्षणाचे महत्त्व सांगितले:

"आजचा दिवस केवळ एक महत्त्वाचा क्षण नाही, तर ऐतिहासिक आहे कारण आपले बँकिंग क्षेत्र सेवा आणि धोरण या दोन्ही स्तरांवर नव्या युगात प्रवेश करत आहे."

“आपण इतके दिवस फक्त हाताळणीवर अवलंबून होतो, आणि एटीएम्ससारख्या गोष्टी फक्त स्वप्न वाटायच्या,” असं बँकेचे महाव्यवस्थापक सिओसे पेनीटाला टेओ यांनी सांगितलं. “ही यंत्रं स्वस्त नाहीत, पण सरकारच्या पाठबळामुळे आणि आमच्या दृढ निश्चयामुळे आम्ही हे सेवा नागरिकांसाठी सुरू करू शकलो.”

प्रीपेड कार्ड्स सुरू; लवकरच डेबिट व क्रेडिट कार्ड्स

सध्या या एटीएम्समध्ये फक्त प्रीपेड कार्ड्सचा वापर करता येतो, जे नागरिकांना आधी घ्यावे लागतील. भविष्यात व्हिसा डेबिट व क्रेडिट कार्ड्सही सुरू करण्याची योजना आहे, जे आंतरराष्ट्रीय प्रवास व ऑनलाइन खरेदीसाठी उपयुक्त ठरतील.

“सध्या ही सेवा मोफत देत आहोत, जेणेकरून लोकांना याचा उपयोग कसा करायचा हे समजेल. नंतर शुल्काचा विचार करू, पण आत्ता हे accessibility आणि प्रगतीबाबत आहे,” असे टेओ यांनी सांगितले.

Pacific Technologies Limited चे निसार अली यांनी या प्रणालीच्या माध्यमातून “लोकांना आधुनिक व विश्वासार्ह बँकिंग सेवेशी जोडण्याची” क्षमता असल्याचे नमूद केले. सरकारने हा उपक्रम केवळ डिजिटल सोयीसाठी नव्हे, तर व्यापक आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले आहे.

हवामान बदलाचे आव्हान कायम

डिजिटल बँकिंगकडे वाटचाल सुरू असली तरी तुवालू अजूनही अस्तित्वाच्या प्रश्नांशी झुंजत आहे. वाढत्या समुद्र पातळीमुळे देशाला दरवर्षी अधिक नुकसान सहन करावे लागत आहे. जमिनीचे आणि शेतीचे नुकसान अधिक गंभीर आहे. 2021 मध्ये, तुवालूचे परराष्ट्रमंत्री सायमन कोफे यांनी समुद्राच्या पाण्यात उभं राहून भाषण करून संयुक्त राष्ट्रांचे लक्ष हवामान बदलाकडे वेधलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT