आंतरराष्ट्रीय

Hajj pilgrims Death | ९० भारतीय हज यात्रेकरूंचा उष्माघाताने मृत्यू, सुत्रांची माहिती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौदी अरेबियाच्या मक्का या मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या शहराचे तापमान हज यात्रेवेळी ५२ अंश सेल्सिअसवर गेले. यामुळे आतापर्यंत ६४५ हज यात्रेकरूंचा (Hajj pilgrims Death) उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याबाबतचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षीच्या हज यात्रेदरम्यान किमान ९० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू उष्णतेच्या लाटेमुळे झाले आहेत. "कोणत्याही अपघाताची नोंद नाही," असे सूत्रांनी सांगितले.

१४ जूनपासून सुरू झालेल्या या यात्रेचा बकरी ईदला समारोप झाला. बुधवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली. दरम्यान, भारत सरकार सौदी अरेबिया सरकारशी संपर्कात असून भारतीय यात्रेकरूंची माहिती घेतली जात आहे.

एएफपीच्या वृत्तानुसार, यापूर्वी एका अरब राजनैतिक अधिकाऱ्याने हज यात्रेदरम्यान किमान ६८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. " यातील काहींचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला. अनेक हज यात्रेकरू वृद्ध होते. काहींचा मृत्यू हवामानाच्या बदललेल्या परिस्थितीमुळे झाला असल्याचे गृहीत धरले आहे," असे त्यांनी सांगितले.

वाढत्या तापमानामुळे मृत्यू

अनेक भारतीय हज यात्रेकरु बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी मंगळवारी, सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली होती की या वर्षी ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश जणांचा मृत्यू मक्कामधील वाढत्या तापमानामुळे झाल्याचे वृत्त एएफपीने दिले होते.

या वर्षी जगभरातून सुमारे १८ लाख लोक हज यात्रेसाठी आले होते. या वर्षी तीव्र उष्णतेची लाट आली आणि तापमान ५० अंश सेल्सिअस पार झाले. अलिकडच्या दशकातील तापमानाची ही सर्वोच्च पातळी आहे.

यात्रेकरूंना सतर्कतेच्या सूचना

सोमवारी मक्केतील मशिदीमधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअस होते. गर्दीही मोठ्या प्रमाणात होती. अराफात पर्वतावरील विधीसह बहुतेक हज विधी दिवसा पार पडतात. यात्रेकरूंना बराच वेळ उन्हात राहावे लागते. त्यात हवामान बदलामुळे मक्केतील तापमान दरवर्षी वाढतच चाललेले आहे. सौदी प्रशासनाने यात्रेकरूंना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. बहुतांश यात्रेकरूंनी छत्रीचा वापर केला. सूचनाही पाळल्या; पण ऊन इतके प्रखर होते की, यामुळे जीवितहानी झाली.

SCROLL FOR NEXT