Astronomer CEO Andy Byron resignation Coldplay kiss cam video :
नवी दिल्ली : असं म्हणतात की एखादी गोष्ट निर्माण करायला आयुष्य लागते, पण ती नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा असतो. अशीच काहीशी गोष्ट अमेरिकेतील AI कंपनी ॲस्ट्रोनॉमरचे सीईओ (CEO) अँडी बायरन यांच्या बाबतीत घडली. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रतिष्ठित पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले असतील, किती कंपन्या बदलल्या असतील, आयुष्यात किती जोखीम पत्करली असेल, पण हे सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं.
कोट्यवधींच्या पगारावर पोहोचलेले अँडी बायरन एका चुकीमुळे सगळं गमावून बसले. बोस्टन शहरात झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये ते आपल्या सहकारी एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबट सोबत गेले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. कॉन्सर्टमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना आणि कॅमेऱ्यापासून नजर चुकवताना दिसत होते, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले. इतकेच नाही, तर कोल्डप्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिनने स्टेजवरूनच, "एक तर या दोघांचे अफेअर सुरू आहे किंवा ते खूप लाजाळू आहेत," असे म्हटले. यानंतर हा प्रकार इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.
शनिवारी एक निवेदन जारी करून ॲस्ट्रोनॉमर कंपनीने बायरन यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कंपनीने म्हटले, "आमच्या नेतृत्वाकडून चांगल्या वर्तनाची आणि जबाबदारीने वागण्याची अपेक्षा केली जाते. अलीकडेच या मानकांचे पालन झाले नाही. अँडी बायरन यांनी राजीनामा दिला आहे, जो संचालक मंडळाने स्वीकारला आहे."
हे प्रकरण समोर आल्यानंतर कंपनीने बायरन यांना रजेवर पाठवून एका अंतरिम सीईओची नियुक्ती केली होती. कंपनीने हेही स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कंपनीच्या 'व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस' एलिसा स्टॉडर्ड नसून, 'चीफ पीपल ऑफिसर' क्रिस्टिन कॅबट आहेत. कंपनी आपल्या मूल्यांप्रति कटिबद्ध असून या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले. हे संपूर्ण प्रकरण मॅसेच्युसेट्समधील फॉक्सबरो येथील जिलेट स्टेडियममध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टमधील आहे. तिथेच 'किस कॅम'ने (Kiss Cam) अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबट यांना मोठ्या स्क्रीनवर दाखवले, ज्यानंतर ते दोघेही कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी खाली वाकले. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला.