पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स ( sunitha williams) आणि बुच विल्मोर हे ९ महिन्यांपेक्षा अधिक काळ अंतराळात होते. आज (दि. १८ मार्च) नासा आणि स्पेसएक्सच्या मिशन क्रू-१० ने त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. बुधवारी (दि.१९मार्च) पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी ते पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतील. आता संपूर्ण जगाच्या नजरा सुनीता विल्यम्स आणि तिच्या साथीदारांच्या परतीच्या प्रवासाकडे खिळल्या आहेत. यासोबतच अवकाशाची रहस्ये जाणून घेण्यार्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. एकुणच अंतराळ यात्रेवर चर्चा सुरु असताना 'बिग थिंक'च्या एका कार्यक्रमात बोलताना निवृत्त अंतराळवीर रॉन गॅरेन यांनी आपल्या अंतराळातील अनुभव शेअर केला आहे.
'मिरर न्यूज'च्या वृत्तानुसार, अवकाशातून पृथ्वी पाहण्याची संधी मिळण्याचे मिळणारे दुर्मिळातील दुर्मिळ. नासाचे माजी अंतराळवीर रॉन गॅरेन हे त्यापैकी एक आहेत. सध्या ६२ वर्षांचे गॅरेन यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल १७८ दिवस अंतराळात व्यतित केले होते. या काळात त्यांनी ७१ दशलक्ष मैल प्रवास केला. २,८४२ वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती.
'बिग थिंक'च्या कार्यक्रमात गॅरेन यांनी आपल्या अंतराळ सफारीचा अनुभव सर्वांची शेअर केला. ते म्हणाले की, " तरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वरून मी जेव्हा पृथ्वीकडे पाहिले तेव्हा माझे विचारच बदलले. जगण्याकडे पाहण्याचा दृष्टकोनच बदलला. मला एक धक्कादायक सत्य कळले की, आपण सारेच एका भ्रमात जगत आहोत. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा मला विजांचे कडकडाट, बदलणारे रंग आणि पृथ्वीच्या वातावरणाचा अत्यंत पातळ थर दिसला. मला जाणवले की, हा पातळ थर आपल्या ग्रहावरील प्रत्येक सजीवाचे रक्षण करतो."
मला जाणवले की, मानवांनी आपले प्राधान्यक्रम चुकीचे ठरवले आहेत. जीवन जगण्यासाठी काय महत्त्वाचे आहे हे आपल्याला अजूनही समजलेले नाही. मी अवकाशातून चमकणारी पृथ्वी पाहिली; पण मला तिथे कुठेही अर्थव्यवस्था दिसली नाही. आपण पृथ्वीवर निर्माण केलेली अर्थव्यवस्था ही पर्यावरण आणि जीवनाला आपला भाग मानते; पण वास्तवात आपण सारेच एका भ्रमात जगत आहोत, असेही गॅरेन यांनी यावेळी नमूद केले.
गॅरेन म्हणाले की, "आपल्याला आपलं भविष्याचा विचार करायचा असेल तर अशा जगाकडे वळवावे लागतील जिथे सर्व मानव समान असतील. सर्वजण एकमेकांवर अवलंबून असतील. जेव्हा लोकांना समजते की आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत आणि आपले जीवन एकमेकांवर अवलंबून आहे तेव्हा आपले विचार खरोखर बदलतील. कोणीही दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. कारण अवकाशातून पाहिल्यावर सर्वजण समान दिसतात. या विशाल आणि सुंदर विश्वासमोर आपल्या मानवांचा अहंकार, श्रेष्ठता आणि अर्थव्यवस्था यांचे अस्तित्व नाही. या जगात आपल्याला अशी अर्थव्यवस्था विकसित करायची आहे जी सर्वांच्या हिताची असेल. हाच बदल आपल्या विकासाला योग्य दिशेने घेऊन जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करत पृथ्वीवरील मानवाला त्याचे विचार बदलावे लागतील अन्यथा भविष्यातील समस्या वाढतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.