तेहरान : वृत्तसंस्था
रशियात झालेल्या भीषण विमान अपघाताची घटना ताजी असतानाच रविवारी इराणमध्ये विमान कोसळून 66 जणांना मृत्यू झाला आहे. इराणच्या असेमन एअरलाईन्सकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. अमेय एअरलाईन्सचे हे विमान राजधानी तेहरानहून यासूज येथे निघाले होते. विमान उड्डाणानंतर काही वेळातच इराणच्या दक्षिण भागात ते कोसळले. मात्र, या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
असेमन एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये एका लहान मुलासह 60 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. दोन इंजिन असलेले हे विमान कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते. सध्या दक्षिण इराणमध्ये ढगाळ वातावरण आहे. विमान ज्या भागात कोसळले तो डोंगराळ परिसर आहे. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी जलदगतीने मदतकार्य हाती घेण्यात आले. मात्र, खराब हवामान आणि डोंगराळ परिसर असल्याने येथे अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.
तेहरानहून निघालेल्या या विमानाचा काही क्षणातच रडारशी संबंध तुटला आहे. यानंतर विमान अपघाताची बातमी मिळाली. यडोंगराळ भागातच विमान कोसळल्याने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आपत्कालीन पथकाला मोठी कसरत करावी लागली.