Artemis 2 mission | चंद्र प्रदक्षिणेनंतर ‘आर्टेमिस-2’ आज पृथ्वीवर परतणार 
आंतरराष्ट्रीय

Artemis 2 mission | चंद्र प्रदक्षिणेनंतर ‘आर्टेमिस-2’ आज पृथ्वीवर परतणार

पॅसिफिक महासागरात होणार ऐतिहासिक स्प्लॅशडाऊन

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस-2 मोहिमेचा अंतिम टप्पा आता जवळ आला असून ओरायन अंतराळयान भारतीय वेळेनुसार शनिवारी (दि. 11) पहाटे 05.37 वाजता सॅन डिएगोच्या किनारपट्टीवर पॅसिफिक महासागरात उतरेल. रिड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन हे चार अंतराळवीर चंद्राभोवतीचा आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण करून पृथ्वीवर परतत आहेत. 1972 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या इतक्या जवळ जाऊन परत येत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या स्प्लॅशडाऊनकडे लागले आहे.

आर्टेमिस-2 मोहिमेतील सर्वात मोठी चिंता ओरायन यानाच्या हिट शील्डबाबत आहे. 2022 मधील चाचणीदरम्यान या शील्डवरील संरक्षक पदार्थाचे तुकडे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात निखळले होते. यामुळे यानाचा मूळ सांगाडा वितळण्याचा धोका निर्माण झाला होता.

जरी नासाने यावर उपाय म्हणून यानाचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग (रिएंट्री पाथ) बदलला असला तरी काही तज्ज्ञांच्या मते मानवी जीवाला असलेला हा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. वातावरणात प्रवेश करताना काही मिनिटांसाठी अंतराळवीरांचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटेल (ब्लॅकआऊट), जो या मोहिमेतील सर्वात तणावपूर्ण काळ असेल. यान हवेत असताना 11 पॅराशूटस्च्या सहाय्याने त्याचा वेग कमी केला जाणार आहे. शेवटी साधारण 32 किमी प्रति तास वेगाने ते समुद्रात उतरेल. नासाच्या यूट्यूब चॅनेल आणि अ‍ॅपवर या ऐतिहासिक लँडिंगचे थेट प्रक्षेपण जगभरातील प्रेक्षकांना पाहता येईल.

यानाभोवती निर्माण होणार 2,700 अंश तापमान

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ओरायन यानाचा वेग तब्बल 38 हजार 300 किमी प्रति तास इतका प्रचंड असणार आहे. या वेगामुळे वातावरणातील घर्षणामुळे यानाभोवती सुमारे 2 हजार 700 अंश सेल्सिअस तापमान निर्माण होईल, जे लाव्हा रसापेक्षाही जास्त उष्ण असते. हे यान सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष अव्हकोट हिट शील्डचा वापर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT