वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराणवर सुरू असलेल्या संयुक्त अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमध्ये 50,000 हून अधिक अमेरिकन सैनिक, 200 लढाऊ विमाने आणि दोन विमानवाहू युद्धनौका सहभागी आहेत, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या प्रमुखांनी उघड केले आहे.
कमांडचे जनरल ब्रॅड कूपर यांनी सांगितले की, या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 2,000 लक्ष्यांवर मारा करण्यात आला असून इराणी नौदलाची प्रचंड हानी करण्यात आली आहे. इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल लष्करी मोहिमेची व्याप्ती सेंट्रल कमांडच्या प्रमुखांनी स्पष्ट केली. अमेरिकन फौजांची ही आतापर्यंतची अभूतपूर्व तैनाती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी एका व्हिडीओ संदेशाद्वारे जनरल ब्रॅड कूपर यांनी, या संयुक्त मोहिमेचा आज चौथा दिवस असून यात 50,000 पेक्षा जास्त सैन्य सहभागी आहे, असे जाहीर केले.
जनरल कूपर यांनी या हल्ल्याची व्याप्ती सांगताना म्हटले की, मोहीम सुरू झाल्यापासून अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील जवळपास 2,000 ठिकाणांवर 2,000 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. परिस्थितीत मोठी वाढ झाल्याचे सूचित करताना, ‘आम्ही इराणचे संपूर्ण नौदल बुडवत आहोत. आतापर्यंत आम्ही इराणची 17 जहाजे नष्ट केली आहेत,’ असे त्यांनी जाहीर केले. यामुळे आखाती समुद्र आणि आसपासच्या भागात इराणच्या नौदल क्षमतेला लक्ष्य केल्यामुळे युद्धाचा विस्तार आता समुद्रातही झाला आहे.
कूपर यांनी, ‘ही मोहीम जसजशी पुढे जात आहे, तसतशी इराणची अमेरिका आणि मित्रराष्ट्रांवर हल्ला करण्याची क्षमता कमी होत चालली आहे,’ असा दावा केला. कुवेत येथील एका टॅक्टिकल ऑपरेशन्स सेंटरवर इराणने केलेल्या हल्ल्यात सहा अमेरिकन सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.