Pakistan Drone Manufacturing | ट्रम्प यांची मुले पाकिस्तानात उभारताहेत ड्रोन उत्पादन युनिट? 
आंतरराष्ट्रीय

Pakistan Drone Manufacturing | ट्रम्प यांची मुले पाकिस्तानात उभारताहेत ड्रोन उत्पादन युनिट?

हरीपूर, रावळपिंडी, तक्षशिला या ठिकाणांची निवड

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांशी संबंधित पॉवरस कंपनी पाकिस्तानमध्ये ड्रोन उत्पादन युनिट उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचे गुंतवणूकदार एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत १६ सप्टेंबर रोजी रावळपिंडी येथे बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत ड्रोन आयात, संरक्षण उत्पादन आणि स्थानिक पातळीवर उत्पादन क्षमता वाढवण्याबाबत चर्चा झाली.

पाकिस्तानमध्ये ड्रोन उत्पादनासाठी हरीपूर, रावळपिंडी आणि तक्षशिला या तीन संभाव्य लष्करी ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. येथे आत्मघाती ड्रोन तयार करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे. युनिटच्या उत्पादन प्रक्रियेत पाकिस्तान लष्कराच्या औद्योगिक युनिटचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. अंतिम ठिकाण निश्चित करण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी १५ ऑक्टोबरनंतर अमेरिकेला भेट देणार असल्याचे सांगितले जाते.पाकिस्तान सध्या चीन आणि तुर्कियेकडून ड्रोन खरेदी करतो.

तुर्कियेसोबत पाकिस्तानने स्थानिक पातळीवर ड्रोन उत्पादनासाठी स्वतंत्र करारही केला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन उत्पादन सुरू झाल्यास भारताच्या सुरक्षेसमोर नवे आव्हान निर्माण होऊ शकते. विशेषतः सीमेपलीकडून ड्रोनचा वापर घुसखोरी, शस्त्रांची तस्करी किंवा लष्करी लक्ष्यांवर हल्ल्यासाठी होण्याची शक्यता लक्षात घेता भारतासाठी काऊंटर ड्रोन क्षमता महत्त्वाची ठरते. प्रस्तावित विलीनीकरणानंतर अमेरिकन व्हेंचर्सकडे कंपनीतील ९.९ टक्के लाभधारक हिस्सा असण्याची अपेक्षा आहे.

पाकिस्तानसोबतचा करार अद्याप अंतिम नाही

पॉवरस कंपनीच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानसोबत झालेला सामंजस्य करार हा अंतिम करार नाही. त्यातून पाकिस्तानवर खरेदीची कोणतीही बंधनकारक जबाबदारी येत नाही. कोणतीही पुढील प्रक्रिया अमेरिकेतील लागू कायदे आणि सरकारी मंजुरीच्या अधीन असेल.

कंपनीचा भारतासोबतही करार

पॉवरस कंपनीचा पाकिस्तानपूर्वी भारतातील एका कंपनीसोबतही करार झाला आहे. ३० जूनच्या नियामक कागदपत्रांनुसार, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजला भारतात ‘गार्डियन-१’ ड्रोन इंटरसेप्टर तयार करण्यासाठी आणि विकण्यासाठी पॉवरसने विशेष परवाना दिला आहे. त्यामुळे पॉवरसची ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित भागीदारी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT