Israel Election | इस्रायलमध्ये सत्तास्थापनेत अरब पक्ष निर्णायक ठरणार 
आंतरराष्ट्रीय

Israel Election | इस्रायलमध्ये सत्तास्थापनेत अरब पक्ष निर्णायक ठरणार

निवडणुकीत विदेशी हस्तक्षेपाच्या आरोपाची होणार चौकशी

पुढारी वृत्तसेवा

तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायलमध्ये संसदीय निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाच्या आघाडीला ५३, तर विरोधी पक्षनेते गादी आयसेनकोट यांच्या आघाडीला ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. अरब पक्षांना एकूण १९ जागा मिळण्याची शक्यता असून, सरकार स्थापनेत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

दरम्यान, निवडणुकीत विदेशी हस्तक्षेपाच्या संशयावरून केंद्रीय निवडणूक समितीने गुप्तचर संस्था ‘शिन बेट’ला चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, कतार आणि तुर्कियेकडून इस्रायल तसेच येथील वेस्ट बँक या भागामध्ये निधी पाठवल्याचा संशय नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाने व्यक्त केला आहे. या पैशाचा वापर अरब नागरिकांवर प्रभाव पाडण्यासाठी झाल्याचा आरोप आहे.

अरब पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

अरब पक्षांच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करून निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याचा आरोप बलाद पक्षाचे प्रमुख सामी अबू शहादेह यांनी केला. राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी विदेशी हस्तक्षेपाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली; मात्र, या निमित्ताने संपूर्ण अरब समुदायाला बदनाम करू नये, असेही बजावले. विरोधी नेते आयसेनकोट यांनी कतारच्या कथित हस्तक्षेपाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली. मात्र, चौकशीच्या नावाखाली नव्या संसदेच्या शपथविधीला विलंब होता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला.

कतारने आरोप फेटाळले

निवडणुकीत हस्तक्षेपाचे आणि अरब मतदारांची संख्या वाढवण्यासाठी पैसे दिल्याचे आरोप कतारने फेटाळले आहेत. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी हे आरोप निरर्थक आणि धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अन्सारी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, इस्रायलमधील काही नेते आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्ती चुकीची माहिती पसरवत आहेत. कतारला इस्रायलमधील राजकीय वादात ओढण्याचा हा प्रयत्न आहे.

अद्याप गैरप्रकाराचे पुरावे नाही

निवडणूक आयोगाचे कार्यवाहक महासंचालक डीन लिवने यांनी गैरप्रकार झाल्याचे आरोप फेटाळले. आतापर्यंत गैरप्रकारांचे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT