वॉशिंग्टन/बीजिंग : वृत्तसंस्था
स्पेनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाने 462 बळी घेतले आहेत. स्पेनमधील मृतांची संख्या 2 हजारांवर पोहोचली आहे. इथे आजअखेर बाधितांची संख्या 29 हजार 909 वर पोहोचली आहे. आणखी 15 दिवस संचारबंदी जारी केली जाईल, अशी स्थिती आहे. पंतप्रधान पेड्रो सान्चेज यांनी तसा ठराव मांडला असून तो मंजूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अमेरिकेतही 24 तासांत शंभर नवे बळी गेले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर प्रचंड त्रागा केला असून, वेळ हातात असताना चीनचे अध्यक्ष हू जिनपिंग यांनी आम्हाला कोरोनाबाबत कळविले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. मी चीनचा, हू जिनपिंग यांचा सन्मान करतो. पण जे त्यांनी केले ते अजिबात योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे!
जगभरातील 192 हून अधिक देशांतून कोरोना फोफावला असून या विषाणूच्या साथीमुळे आजअखेर जगभरात 15,418 जणांचा बळी गेला आहे. आजअखेर 3 लाख 45 हजार 292 जणांना या आजाराची बाधा झाली आहे. चीनमध्ये सोमवारपर्यंत 89 टक्के रुग्ण बरे होऊन घरी रवाना झाले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. आतापर्यंत या देशात 81,093 प्रकरणे समोर आली. आतापावेतो 72,703 रुग्ण बरे झाले असून या सर्वांना घरी पाठवण्यात आले आहे. सध्या 5,129 रुग्ण दाखल आहेत. चीनमध्ये या आजारामुळे 3,270 जणांचा बळी या आजाराने घेतला आहे.
न्यूयॉर्कमध्ये 12,345 रुग्ण
अमेरिकेत एकाच दिवसांत 14,550 नवे रुग्ण आढळले आहेत. यातले एक तृतीयांश एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत. 24 तासांत इथे 12,345 प्रकरणे समोर आली आहेत. अमेरिकेत 1800 लोकांमागे 5 डॉक्टर आहेत. भारतात इतक्या लोकांमागे केवळ एक डॉक्टर आहे.
रशियात महिला डॉक्टरला कारावास
रशियात एका महिला डॉक्टरने आपली परदेश दौर्याची माहिती लपविल्यावरून त्याला कारावासात पाठविण्यात आले आहे. ती स्पेनमध्ये सुट्टी घालवून परतलेली होती. 1200 लोकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रशियात गेल्या 24 तासांत 61 नवे रुग्ण आढळले आहेत. आजअखेर रुग्णांची संख्या 367 झाली आहे. रशियन राष्ट्रपती पुतिन यांनी रविवारी सांगितले की, स्थिती आटोक्यात आली आहे. रशियालगतच्या कझाकिस्तानातील अल्माटी विमानतळावर मेडिकलचे 170 भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.
जर्मनीत तिघांच्या एकत्र बसण्यावरही बंदी
जर्मनीत 19,610 जणांना आजवर बाधा झाली आहे. 55 जणांचा बळी गेला आहे. जर्मनीने आता दोन जणांहून अधिक जणांच्या एकत्र बसण्यावरही बंदी घातली आहे. जर्मन चांसलर एंजेला मर्केल म्हणाल्या की, आम्ही कसे वागतो त्यावर संक्रमणाचे आटोक्यात येणे किवा फोफावणे अवलंबून आहे. मी स्वत: घरी राहून काम करते आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने एक रिपोर्ट जारी केला असून, आफ्रिकेतील 4 देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे म्हटले आहे. रिपोर्टनुसार जगभरात 24 तासांत नवे 26,069 रुग्ण आढळले असून, या कालावधीत 1600 जणांचा मृत्यू झाला आहे.
'चीनचे धोरण काळजी वाढवणारे'
ट्रम्प म्हणाले की, मी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामुळे त्रस्त आहे. चीनने वेळ हातात असतानाच अमेरिकेला, जगाला या साथीबद्दल कळवायला हवे होते. विषाणूची गती माहिती असूनही चीनने माहिती लपविली आहे. हे भयावह आहे. मी चीनशी, जिनपिंगशी नेहमी प्रामाणिक राहिलो आहे म्हणून मला जास्त त्रास होतो आहे. मी जिनपिंग यांचाही आणि त्यांच्या देशाचाही आदर करतो आणि म्हणून माझी अपेक्षाही अवाजवी नाही. अमेरिकेने चीनमध्ये तज्ज्ञ पाठविण्याचा प्रस्ताव चीनसमोर ठेवला होता, त्याकडेही चीनने लक्ष दिलेले नाही. हे माझी काळजी वाढविणारे आहे.
न्यूझीलंडमध्ये दोन दिवसांत दुप्पट रुग्ण
न्यूझीलंडमध्ये गेल्या 48 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. सरकार आता लॉकडाऊनच्या तयारीत आहे. देशात आता रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. कॅनडामध्ये बाधितांची संख्या 1470 वर गेली असून या देशांत 20 जणांचा बळी या आजाराने घेतला आहे.
अमेरिकेत 24 तासांत शंभरावर बळी
अमेरिकेतही रविवारी 14,550 नवे रुग्ण आढळले आणि 100 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत बाधितांची संख्या 33,276 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा 419 वर गेला आहे.