Mars ancient life evidence | मंगळावर आढळले प्राचीन जीवसृष्टीचे पुरावे  Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Mars ancient life evidence | मंगळावर आढळले प्राचीन जीवसृष्टीचे पुरावे

‘नासा’च्या रोव्हरने लावला शोध; आता होणार आणखी सखोल अभ्यास

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : ‘नासा’च्या ‘पर्सिव्हिअरन्स’ या मंगळ रोव्हरने एका कोरड्या नदीच्या पात्रामध्ये असे खडक शोधले आहेत, ज्यात प्राचीन सूक्ष्मजीवांचे संभाव्य संकेत असू शकतात, अशी माहिती शास्त्रज्ञांनी बुधवारी दिली. तथापि, जोपर्यंत हे नमुने पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये सखोलपणे तपासले जात नाहीत, तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

2021 पासून मंगळावर भ्रमण करत असलेला हा रोव्हर थेट जीवसृष्टी शोधू शकत नाही; परंतु एकेकाळी वस्तीयोग्य मानल्या जाणार्‍या ठिकाणांहून नमुने गोळा करण्यासाठी त्यात एक ड्रिल आणि ट्यूब्स बसवण्यात आल्या आहेत. हे नमुने पृथ्वीवर परत आणण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु ‘नासा’ सध्या स्वस्त आणि वेगवान पर्यायांच्या शोधात असल्याने ही मोहीम थांबली आहे.

या अभ्यासात सहभागी नसलेल्या दोन शास्त्रज्ञांनी सेटी इन्स्टिट्यूटच्या जेनिस बिशप आणि मॅसॅच्युसेटस् महर्स्ट विद्यापीठाच्या मारिओ पॅरेंटे यांनी याला एक रोमांचक शोध म्हटले आहे; परंतु अजैविक प्रक्रियादेखील यासाठी कारणीभूत असू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हा शोध महत्त्वाचा का आहे?

स्टोन ब्रूक विद्यापीठाचे प्रमुख संशोधक जोएल हुरोविट्झ यांनी यावर जोर दिला की, सूक्ष्मजीव हे एक संभाव्य स्पष्टीकरण असले, तरी इतर मार्गांनीही या रचना तयार होऊ शकतात. ते पुढे म्हणाले की, जरी या शोधातून प्राचीन जीवसृष्टी सिद्ध झाली नाही, तरी निसर्ग कशाप्रकारे जीवसृष्टीच्या संकेतांची नक्कल करू शकतो, याचा हा एक मौल्यवान धडा आहे.

हे नमुने ‘नेरेत्वा व्हॅलिस’ या नदीच्या पात्रातील लालसर, चिकणमाती-समृद्ध गाळाच्या खडकांमधून आले आहेत. हे पात्र एकेकाळी जेझेरो क्रेटरमध्ये वाहत होते. हुरोविट्झ आणि त्यांच्या टीमला सेंद्रिय कार्बनसोबत सूक्ष्म कण सापडले आहेत, ज्यांना पॉपी सीडस् आणि लेपर्ड स्पॉटस् (बिबट्याचे ठिपके) असे नाव दिले आहे. हे कण आयर्न फॉस्फेट आणि आयर्न सल्फाईडने समृद्ध होते. पृथ्वीवर, ही संयुगे सेंद्रिय पदार्थ खाणार्‍या सूक्ष्मजीवांद्वारे तयार होणारी सामान्य उत्पादने आहेत.

जोपर्यंत हे नमुने मंगळावरून आणले जात नाहीत, तोपर्यंत शास्त्रज्ञांना प्राचीन मंगळावरील जीवसृष्टीच्या शक्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी पृथ्वीवरील तुलना आणि प्रयोगशाळेतील प्रयोगांवर अवलंबून राहावे लागेल. बिशप आणि पॅरेंटे यांनी त्यांच्या संपादकीयात नमूद केल्याप्रमाणे, जरी आज मंगळावर सूक्ष्मजीवांचे कोणतेही पुरावे नसले, तरी जेझेरो क्रेटरमधील तलावातील प्राचीन सूक्ष्मजीवांनी सल्फेट खनिजांचे रूपांतर सल्फाईडमध्ये केले असावे, ही प्रक्रिया पृथ्वीवर दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT