लंडन: पुढारी ऑनलाईन
जागतिक पातळीवरील मानवाधिकार संघटना अॅमनेस्टी इंटरनॅशनलने म्यानमारच्या नेत्या आणि स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांना दिलेला पुरस्कार परत घेतला आहे. स्यू की यांनी म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर लष्कराकडून झालेल्या अत्याचारावर त्यांनी कोणतीच भूमिका न घेतल्याने संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
अॅमनेस्टीने सोमवारी स्यू की यांना 2009मध्ये दिलेला अॅम्बेसेडर ऑफ कॉन्शन्स पुरस्कार परत घेत असल्याचे सांगितले. आम्ही अतिशय निराश आहोत. तुम्ही आशा, साहस आणि मानवाधिकाराच्या रक्षणासाठीचे प्रतीक राहल्या नाही. त्यामुळेच तुम्हाला दिलेला पुरस्कार परत घेत आहोत, असे अॅमनेस्टीने स्यू की यांना कळवले आहे.
गेल्या एक वर्षापासून म्यानमारमधील लष्कराकडून रोहिंग्या मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. देशातील रखाइन प्रांतातील सात लाखांहून अधिक लोकांनी पळ काढला आहे. रोहिंग्यांवर इतके अत्याचार होऊन सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवाधिकारासाठी लढणाऱ्या स्यू की यांनी त्यावर काहीच भूमिका घेतली नाही.
स्यू की यांनी देशातील लष्करशाही विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना 15 वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या लढ्यासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. यात शांततेच्या नोबेल पुरस्काराचा देखील समावेश आहे.