वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. चर्चेच्या टेबलावर या, अन्यथा यापेक्षा फार वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. आयोवा राज्यातील क्लाइव्ह येथे झालेल्या प्रचारसभेत ट्रम्प यांनी अमेरिकेची आणखी एक नौदल तुकडी वेगाने इराणच्या दिशेने रवाना होत असल्याचे जाहीर केले.
क्लाइव्हमधील सभेत ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना अमेरिकेच्या सागरी ताकदीवर भर दिला. सध्या इराणच्या दिशेने आणखी एक सुंदर आर्माडा पुढे सरकत आहे. आम्हाला करार हवा आहे, इराणने चर्चेला यावे, असे त्यांनी सांगितले. मात्र, इराणने माघार न घेतल्यास लष्करी कारवाई अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या वक्तव्याच्या काही दिवस आधीच अमेरिकेने अब्राहम लिंकन कॅरिअर स्ट्राईक ग्रुप पश्चिम आशियात तैनात केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या कार्यक्षेत्रात, हिंद महासागरात हा ताफा दाखल झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. व्हाइट हाऊसने अतिरिक्त नौदल तैनातीचा नेमका तपशील किंवा ठिकाण जाहीर केलेले नसले, तरी संरक्षण विभागाने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी उपस्थिती वाढवण्यात आल्याची पुष्टी केली आहे.
‘इराण इंटरनॅशनल’च्या वृत्तानुसार, अमेरिकेकडून होणार्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई तेहरानमधील भूमिगत बंकरमध्ये गेले आहेत. त्यांच्या कार्यालयाचा दैनंदिन कारभार तिसरे पुत्र मसूद खामेनेई पाहत असल्याचे सांगितले जाते.
याच वेळी इराणची अर्थव्यवस्था गंभीर अडचणीत सापडली असून, इराणी चलन रियाल मंगळवारी विक्रमी घसरणीसह डॉलरमागे 14.8 लाख रियालच्या पुढे गेले आहे. वाढता लष्करी आणि राजकीय तणाव इराणसाठी बहुआयामी संकट निर्माण करत असल्याचे चित्र आहे.