america iran us state department issues security citizens leave immediately
पुढारी ऑनलाईन :
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनं आणि हिंसाचार सुरू असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठा सुरक्षा इशारा जारी केला आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना “विलंब न करता” ईराण सोडण्याचा कडक इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प इराणबाबत जवळपास युद्धाच्या भूमिकेत येताना दिसत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी आपत्कालीन सुरक्षा अलर्ट जारी करून सर्व अमेरिकन नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांनंतर आणि सुरक्षा दलांकडून झालेल्या प्राणघातक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 500 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना अटक करण्यात आल्याच्या बातम्या आहेत.
दुहेरी नागरिकत्व असणाऱ्यांवर टांगती तलवार
अमेरिकन प्रशासनाने सांगितले आहे की इराण सरकार दुहेरी नागरिकत्वाला (U.S.–Iranian) मान्यता देत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना पूर्णपणे इराणी नागरिक मानले जाऊ शकते आणि त्यांच्यावर तेथील कठोर कायदे लागू होऊ शकतात. अमेरिकन पासपोर्ट दाखवणे किंवा अमेरिकेशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा आढळणे हे अटकेचे कारण ठरू शकते. इराणला अमेरिकन दुतावास नसल्याने, अडचणीत सापडलेल्या अशा नागरिकांना सरकारी मदत मिळणे जवळपास अशक्य आहे.
इराणने “रेड लाईन” ओलांडल्यास....
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निदर्शकांवरील दडपशाहीविरोधात लष्करी हस्तक्षेपाचा पर्याय फेटाळून लावलेला नाही. व्हाइट हाऊसने संकेत दिले आहेत की, इराणने “रेड लाईन” ओलांडल्यास अमेरिका कठोर लष्करी कारवाई करू शकते. अमेरिकेने आपल्या नागरिकांना आंदोलनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असून, पुरेसा अन्नसाठा आणि पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच सुरक्षेसाठी कोणत्यातरी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असेही आवाहन केले आहे.