Amazon layoffs
जगभरातील मोठ्या कंपन्यांत नोकरकपातीच्या फेऱ्या सुरुच आहेत. याचा हजारो कर्मचाऱ्यांना फटका बसत आहे. मायक्रोसॉफ्टनंतर आता अॅमेझॉन कंपनीने नोकरकपातीची घोषणा केली आहे. अॅमेझॉन त्यांच्या डिव्हायसेस आणि सेवा विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. स्वतः कंपनीने बुधवारी याची पुष्टी केली.
या डिव्हायसेस आणि सेवा विभागात अलेक्सा व्हॉइस असिस्टंट, इको हार्डवेअर, रिंग व्हिडिओ डोअरबेल्स आणि झूक्स रोबोटॅक्सिस साररखे व्यवसाय समाविष्ट आहेत.
"आमच्या सध्या सुरु असलेल्या कामाचा भाग म्हणून आमच्या टीम्स आणि प्रोग्राम्स अधिक कार्यक्षमतेने काम करावेत आणि आमच्या उत्पादन रोडमॅपशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने आम्ही काही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे," असे अॅमेझॉनच्या प्रवक्त्या क्रिस्टी श्मिट यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
"आम्ही हा निर्णय सहजपणे घेतलेला नाही. यातील प्रभावित कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा राहील. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत." असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
पण कंपनीकडून हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की नोकरकपातीचा फटका कोणत्या युनिट्सना बसला आहे. याबाबतचे वृत्त याआधी रॉयटर्सने दिले होते. दरम्यान, अॅमेझॉनने सांगितले की ते डिव्हाइसेस आणि सेवा विभागात कर्मचाऱ्यांची भरती सुरु राहील.
अमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांचा कंपनीचा खर्च कमी करण्यावर भर आहे. त्याचा एक भाग म्हणून नोकरकपात केली जात आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून अमेझॉनने २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या वर्षीही नोकरकपात सुरूच आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची नोकरकपात कमी आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये डिव्हायसेस आणि सेवा विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते.
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीने मंगळवारी ६ हजार नोकरकपातीची घोषणा केली होती. ही त्यांची दुसरी मोठी नोकरकपात आहे. जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांपैकी ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाईल. याचा परिणाम सर्व स्तरावरील टीममधील हजारो कर्मचाऱ्यांवर जाणवेल. या नोकरकपातीच्या या फेरीत सुमारे ६ हजार कर्मचारी असतील, असे मायक्रोसॉफ्टने म्हटले होते.