अमेझॉन कंपनीचे संस्थापक व जगातील तिसर्या क्रमाकांचे श्रीमंत उद्योगपती जेफ बेझोस ( Jeff Bezos) हे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. इटलीतील व्हेनिस शहरात एका भव्य समारंभात माजी टीव्ही पत्रकार लॉरेन सांचेझ यांच्याबरोबर त्यांनी नव्या जीवनाची सुरुवात केली . या हाय-प्रोफाइल सोहळ्यास बिल गेट्स, किम कार्दशियन, क्रिस जेनर, कार्ली क्लॉस, इव्हांका ट्रम्प आणि ऑर्लॅंडो ब्लूम यांच्यासह अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होते. दरम्यान, या शाही विवाह सोहळ्याची सुरुवात गुरुवार, २६ जूनला झाली होती. या लग्नासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा केला जात आहे.
विवाह सोहळ्यापूर्वी बेझोस आणि सांचेझ हे ग्रँड कॅनालवर असलेल्या आलिशान ‘अमन व्हेनिस हॉटेल’मधून वेगवेगळ्या वेळी बाहेर पडताना दिसले. व्हेनिस सिटी हॉलने या सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले होते, जिथे पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
अब्जाधीश जेफ बेझोस यांनी मे २०२३ मध्ये सांचेझ यांच्याबरोबरचे नाते अधिकृतरित्या जाहीर केले हेते. जेफ आणि लॉरेन यांचा विवाह शनिवार, २८ जून रोजी सॅन जॉर्जिओ बेटावरील ‘स्कूओला ग्रांडे डेला मिसेरिकोर्डिया’ येथे होणार होता. मात्र या सोहळ्याला काही सामाजिक संघटनांनी विरोध केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शेवटच्या क्षणी विवाहस्थळात बदल करण्यात आला.
जेफ बेझोस हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२०.९ बिलियन डॉलर्स आहे. त्यांनी आपल्या विवाहासाठी संपूर्ण सॅन जॉर्जिओ बेट बुक करण्याची तयारी केली होती. या बहुचर्चित विवाह सोहळ्यासाठी २३ ते २८ जून दरम्यान व्हेनिसमध्ये जगभरातील शेकडो हाय-प्रोफाइल व्यक्तीही येणार होते. यामध्ये जेफ बेझोस यांचे सेलिब्रिटी मित्र ओप्रा विन्फ्रे, मिक जॅगर आणि केटी पेरी यांचा समावेश होता. या सोहळ्यात इवांका ट्रम्पदेखील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पाहुण्यासाठी व्हेनिसमधील सर्वात आलिशान हॉटेल्स बुक करण्यात आली होती. या भव्य विवाह सोहळ्यासाठी व्हेनिस शहरातील काही भाग बंद करणार येणार असल्याचीही चर्चा होती. हा भव्य विवाहसोहळा म्हणजे श्रीमंत आणि वंचित यांच्यातील वाढत्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे प्रतीक आहे. या शाही विवाहासाठी शहरातील सामान्य नागरिकांच्या गरजांकडे आणि सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप व्हेनिसमधील सामाजिक संघटनांनी केला होता. हा विरोध पाहता अखेर सुरक्षेच्या कारणास्तव विवाह स्थळच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.