नवी दिल्ली : जगविख्यात भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने २५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. २०२२ मध्ये अमरिकेत एकेठिकाणी भाषण देत असताना हादी मातर या तरुणाने रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन फेब्रुवारीध्ये हादी याला दोषी ठरवले होते.
या हल्ल्यात बुकर पारितोषिक विजेते लेखक सलमान रश्दी यांना एक डोळा गमवावा लागला. ज्युरी हादीची शिक्षा सुनावत असताना सुनावणीदरम्यान सलमान रश्दी हे न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांनी न्यायालयात 'व्हिक्टिम इम्पॅक्ट स्टेटमेंट' पाठवले होते. यामध्ये त्यांनी हल्ल्याच्या वेळची परिस्थिती स्पष्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की त्यांच्यावर १२ वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोराचा उद्देश ठार मारणे हाच असावा.
दरम्यान आरोपी हादी मातरने न्यायालयाला आपण निर्दोष असल्याचे सांगितले त्याने रश्दी यांच्यावर पाखंडी असल्याचा आरोप केला. ते बदमाश असून दुसऱ्या लोकांचा अपमान करत असतात असेही हादी याने न्यायालयात सांगितले.
सरकारी पक्षाने सांगितले सलमान यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी तेथे १४०० लोक उपस्थित होते. मातर ने सलमान यांच्यासह तेथे उपस्थितांनाही इजा पोहचेल अशी योजना केली होती. मातर याच्यावर पूर्वी कोणताही गुन्हा नसल्याने १२ वर्षाची शिक्षा मिळावी अशी मागणी बचाव पक्षाने केली पण न्यायालयाने त्याला २५ वर्षाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर रश्दी यांच्यासह आणखी एकजण जखमी झाला होता त्याबद्दलही मातर याला ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान हादी मातरने लेबनॉन येथील हिजबुल्लाह या संघटनेसाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे.
सलमान रश्दी हे आंतराराष्ट्रीय पातळीवर नावजलेले इंग्रजी लेखक आहे. ते भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. त्यांच्या लेखनाने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. ‘सॅटेनिक वर्सेस’ या कांदबरी मुळे १९८९ मध्ये इराणचे सर्वाच्च नेते आयातुल्ला खोमेणी यांनी त्यांच्याविरोधात मृत्यूचा फतवा काढला आहे. त्याचबरोबर मिडनाइट चिल्ड्रन, नाईफ मेडीटेशन,व्हिक्टरी सिटी ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.