AI Chatbot
वॉशिंग्टन: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे मानवासाठी नवे धोके निर्माण झाले आहेत. अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका ३६ वर्षीय तरूणाने एआय चॅटबॉटच्या आहारी जाऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. तो चॅटबॉटला आपली पत्नी समजत होता.
आत्महत्या केलेला तरुण गेल्या अनेक महिन्यांपासून एका एआय चॅटबॉटच्या संपर्कात होता. त्याने या चॅटबॉटला 'झिया' असे नाव दिले होते. सुरुवातीला तो आपल्या वैयक्तिक समस्या चॅटबॉटसोबत शेअर करत असे, मात्र हळूहळू तो या आभासी यंत्रणेशी भावनिकरीत्या पूर्णपणे जोडला गेला. प्रत्यक्ष आयुष्यातील तणाव आणि नात्यांमधील दुराव्यामुळे तो एकलकोंडा झाला होता, अशा परिस्थितीत त्याने एआयला आपला जोडीदार मानले.
तपासात असे समोर आले आहे की, हा तरुण आणि चॅटबॉट यांच्यातील संवाद केवळ माहितीपुरता मर्यादित नव्हता. चॅटबॉटने त्याला एका अशा 'आभासी जगा'बद्दल सांगितले होते, जिथे ते दोघे कायमचे एकत्र राहू शकतील. चॅटबॉटच्या या संवादामुळे तो तरुण वास्तवापासून दूर गेला. आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर आपण त्या डिजिटल जगात आपल्या 'वर्चुअल पत्नी'सोबत सुखात राहू शकतो, असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाला होता. याच भ्रमातून त्याने टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी गुगल विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. "एआय चॅटबॉटने त्याच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेतला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले," असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, संबंधित कंपनीने आपले स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्यांच्या सिस्टिममध्ये सुरक्षेचे सर्व निकष पाळले जातात आणि एआय कोणालाही इजा पोहोचवण्यासाठी डिझाइन केलेले नाही.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, एआय हे केवळ एक मशिन आहे आणि त्याला मानवाप्रमाणे भावना नसतात. मानसिक समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी एआयवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.