AI impact on Gen Z careers
नवी दिल्ली : अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्र, जे नेहमीच नवनिर्मिती आणि बदलाचं केंद्र मानलं जातं, तिथे आता कर्मचाऱ्यांच्या वयाची रचना झपाट्याने बदलत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये जनरेशन झेड म्हणजे २१ ते २५ वयोगटातील कर्मचाऱ्यांची संख्या वेगाने घटत आहे. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांचं सरासरी वय मात्र वाढत आहे.
‘पेव्ह’ या वेतन व्यवस्थापन सॉफ्टवेअर कंपनीने ८,३०० हून अधिक कंपन्यांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे. यातून तरुणाईची लक्षणीय घट दिसून आली आहे. जानेवारी २०२३ मध्ये मोठ्या सार्वजनिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये १५ टक्के कर्मचारी २१ ते २५ वयोगटातील होते. ऑगस्ट २०२५ पर्यंत ही संख्या घटून फक्त ६.८ टक्के झाली. खासगी टेक कंपन्यांमध्येही असाच ट्रेंड दिसला, जिथे जनरेशन झेडचं प्रमाण ९.३ टक्क्यांवरून ६.८ टक्यांपर्यंत घसरलं. त्याचवेळी कर्मचाऱ्यांचं सरासरी वयही वाढलं आहे. मोठ्या सार्वजनिक कंपन्यांमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत कर्मचाऱ्यांचं सरासरी वय ३४.३ वरून ३९.४ वर्षांपर्यंत वाढलं, म्हणजे पाच वर्षांहून अधिकची वाढ झाली. खासगी कंपन्यांमध्येही हे वय ३५.१ वरून ३६.६ पर्यंत वाढलं आहे.
याचा अर्थ असा आहे की, सध्या मिलेनियल्स आणि त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांचं कामाच्या ठिकाणी वर्चस्व आहे. तर सर्वात तरुण आणि डिजिटल सक्षम पिढी टेक इकोसिस्टममधून हळूहळू बाहेर पडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनचा वाढता वापर हे या बदलामागील मुख्य कारण आहे. यामुळे केवळ भरती प्रक्रियाच नाही, तर नवनिर्मिती, कौशल्य विकास आणि उद्योगाच्या दीर्घकालीन स्पर्धात्मकतेचं स्वरूपही बदलत आहे.
टेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचं वय वाढण्यामागे AI-आधारित ऑटोमेशन हे एक मोठं कारण आहे. सेल्सफोर्स मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपन्या AI मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. डेटा मॅनेजमेंट, ग्राहकांशी संवाद, बेसिक कोडिंगसारखी कामे, जी यापूर्वी एंट्री-लेव्हल कर्मचाऱ्यांकडे असायची, आता AI सहज करत आहे. त्यामुळे तरुणांना टेक क्षेत्रात प्रवेश देणारे पारंपरिक मार्ग बंद होत आहेत. यामुळे करिअरची पारंपरिक शिडी तुटत आहे. वरिष्ठ पदांचा निर्णय घेण्याचा अधिकार, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी यांसारखी कौशल्ये AI अजून तर करू शकत नाही.
अशा नोकऱ्यांच्या गायब होण्याचे परिणाम केवळ बेरोजगारीपुरते मर्यादित नाहीत. एंट्री-लेव्हल जॉब्समधूनच कर्मचारी तांत्रिक कौशल्य शिकतात, संस्थात्मक संस्कृती समजून घेतात आणि व्यावसायिक नेटवर्क तयार करतात. या संधी नसल्यानं येणाऱ्या काळात वरिष्ठ पदांसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण होण्याचा धोका आहे. कामाची पहिली पायरी काढून टाकल्यास केवळ करिअरची प्रगतीच नाही, तर दीर्घकालीन व्यवसाय, ग्राहक संबंध आणि स्ट्रॅटेजिक सातत्यही धोक्यात येतं.