काबूल : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मतदान नोंदणी केंद्राबाहेर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात 50 जण ठार झाले, तर 64 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामागे 'इसिस'चा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अफगाणिस्तान-मधील मतदान नोंदणी केंद्राबाहेर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी 14 एप्रिलपासून मतदान नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. मात्र,
अफगाणिस्तानमध्ये लोकशाही प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
काबूलमधील काला-ए-नजीर भागात मतदार नोंदणीसाठी केंद्र उभारले गेले आहे. यासाठी रविवारी सकाळी मतदारांनी नाव नोंदणीसाठी गर्दी केली होती. यावेळी या ठिकाणी गुप्त पद्धतीने ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला गेला. काही क्षणातच या भागात मृत्यूचे तांडव झाले. घटनास्थळी धाव घेत पोलिस आणि आपत्कालीन पथकाने जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Tags : Afganistan, Attack, Deaths, Registration, kabul