Abu Katal | हाफिज सईदचा भाचा अबू कतालची पाकिस्तानात हत्या  file photo
आंतरराष्ट्रीय

भारताचा आणखी एक शत्रू ठार! हाफिज सईदचा भाचा अबू कतालची पाकिस्तानात हत्या

Abu Katal | काश्मीरमधील अनेक हल्ल्यांमध्ये होता सहभाग

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Abu Katal | मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा भाचा आणि काश्मीरमधील अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कताल याला पाकिस्तानमध्ये ठार मारण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. कताल हा भारतातील रियासी हल्ल्याचा सूत्रधार होता. तो एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.

शनिवारी रात्री पाकिस्तानातील झेलम येथे अबू कतालची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मते, अबू कताल २००२-०३ मध्ये भारतात आला होता. त्यावेळी तो काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागात सक्रिय होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये बसून तो जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत हल्ल्याचे कट रचत होता. हाफिज सईदने जम्मू आणि काश्मीरवर मोठा हल्ला करण्याची जबाबदारी अबू कतालला दिली होती. हाफिजने कतालला लष्कराचा मुख्य ऑपरेशनल कमांडर बनवले होते. हाफिजकडून आदेश मिळल्यानंतर तो काश्मीरमध्ये हल्ले करत असे. ९ जून रोजी झालेल्या रियासी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.

राजौरी हल्ला आणि एनआयए आरोपपत्र

२०२३ च्या राजौरी हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आरोपपत्रात अबू कतालचे नाव होते. १ जानेवारी २०२३ रोजी राजौरीतील धांगरी गावात नागरिकांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आयईडी स्फोट झाला. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याबाबत, एनआयएने त्यांच्या आरोपपत्रात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांची नावे नोंदवली होती, ज्यामध्ये कतालचे नाव होते. तपासादरम्यान असे आढळून आले होते की, दहशतवाद्यांना अबू कतालच्या सूचनेवरून लॉजिस्टिकल सपोर्ट मिळाला होता. रियासी हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांना धांगरीमध्ये सुमारे तीन महिने अन्न, निवारा आणि इतर रसद पुरवली जात होती.

रियासी हल्ल्याचा मास्टरमाइंड

९ जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अबू कताल हा देखील त्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक होता. याशिवाय, अबू कतालला काश्मीरमधील अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड मानले जात असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT