आंतरराष्ट्रीय

पाकने बांगड्या भरलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अण्वस्त्रे

Arun Patil

श्रीनगर, वृत्तसंस्था : आपण व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ आणि पाकिस्तान गंमत बघत राहील काय? पाकिस्ताननेही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. पाककडे अणुबॉम्ब आहे. तो ते भारतावर टाकतील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी सोमवारी दिला. फारूख अब्दुल्लांच्या या वक्तव्याने देशभरात गदारोळ निर्माण झाला असून फारूख अब्दुल्लांकडून पाकिस्तानचे हे खुले समर्थन असल्याची टीका भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरबद्दल केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर फारूख अब्दुल्लांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिलेली आहे, हे विशेष!

भकास पाकिस्तान तसेच विकासाच्या वाटेवरील भारत पाहता पाकव्याप्त काश्मीरमधील आमचे बांधव स्वतःच भारतासोबत येतील, असे राजनाथ सिंह दार्जिलिंग येथील सभेत म्हणाले होते. भारताला त्यासाठी युद्धच काय, साधा बळाचा वापरही करावा लागणार नाही, असेही सिंह म्हणाले होते. सिंह यांनी युद्धाची भाषाही केलेली नसताना, भारतातील फारूख अब्दुल्लांसारखा एक नेता पाकिस्तानच्या प्रवक्त्याच्या थाटात त्यावर प्रतिक्रिया देत असेल, तर हे अत्यंत भयावह आहे, असा सूर भाजपमधून उमटलेला आहे. फारूख अब्दुल्ला यांनी पूंछ हल्ल्यावरही बोट ठेवले. फारूख अब्दुल्ला म्हणाले की, 370 कलम हटविल्यानंतर दहशतवादाला आळा बसेल, असे भाजपचे म्हणणे होते. कुठे आळा बसलाय?

'पीओके' काय आहे?

'पीओके' म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर. या भागाची सीमा पाकिस्तानला लागून आहे. 1947 मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानातील कबिल्यांनी काश्मीरवर हल्ला केला होता. भारतीय लष्कर त्यांच्याशी लढत होते; पण त्याचवेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू काश्मीरचा विषय घेऊन संयुक्त राष्ट्रामध्ये गेले. संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप केला आणि 'जैसे थे' स्थितीसह युद्धविराम घडवून आणला.
कबिलेवाल्यांच्या ताब्यात राहिलेला काश्मीरचा भाग या युद्धविरामामुळे पाकच्या ताब्यात गेला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय सीमेऐवजी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) दोन्ही बाजूला दोन्ही देशांचे सैन्य उभे आहे. एलओसी 840 कि.मी. लांबीची आहे.

'पीओके' आम्ही मिळवूच : जयशंकर

फारूख अब्दुल्ला काहीही म्हणूदेत, व्याप्त काश्मीर आमचा आहे आणि आम्ही तो पुन्हा मिळविणार आहोत, असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

अब्दुल्लांकडून पाकची भाषा : योगी आदित्यनाथ

इंडिया आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस असो, सप असो, नॅशनल कॉन्फरन्स असो या पक्षांच्या नेत्यांची वक्तव्ये दहशतवादाला, फुटीरवादाला प्रोत्साहन देणारीच असतात. फारूख अब्दुल्लांचे वक्तव्य तर जणू पाकिस्तानातून आलेली प्रतिक्रिया आहे, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.

…मग आमच्याकडे लवंगी फटाके आहेत काय? : गिरीराज सिंह

फारूख अब्दुल्ला म्हणतात त्याप्रमाणे पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, तर भारताकडेही काही लवंगी फटाके नाहीत. देशात मुस्लिम मतांसाठी एक मोहीमच चाललेली आहे. मागासवर्गीयांचा, एससी/एसटींचा वाटा मुस्लिमांना देण्याचे षड्यंत्र काय चाललेय, दहशतवादाला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये काय देताहेत. देशाची चाड कुणालाही नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT