Asim Munir invited to US military parade June 14 US Army 250th anniversary
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांना अमेरिकेच्या 250 व्या लष्कर जयंतीनिमित्त वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या लष्करी संचलनासाठी निमंत्रण देण्यात आले असून, ते या समारंभात उपस्थित राहणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
या दौऱ्यादरम्यान, जनरल मुनीर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील आणि पेंटागॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, 14 जून रोजी होणाऱ्या संचलनाच्या दिवशीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 79 वा वाढदिवस देखील आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिला यांनी काँग्रेसच्या एका सुनावणीत जनरल मुनीर यांचे कौतुक करताना, "पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढ्यातील अत्यंत विश्वासार्ह भागीदार आहे," असे मत व्यक्त केले होते. कुरिला आणि मुनीर हे गेल्या दोन वर्षांत तिसऱ्यांदा भेटणार आहेत.
या दौऱ्यामुळे भारतात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे कम्युनिकेशन सेलचे प्रमुख जयराम रमेश यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ल्याआधी भडकाऊ वक्तव्ये केली होती. अमेरिका नेमकं काय करतेय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, हे निमंत्रण म्हणजे भारताचा आणखी एक मोठा राजनैतिक पराभव आहे.
पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. या हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी आक्रमक राजनैतिक मोहीम हाती घेतली असून, 33 देशांमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी पाठवून विरोध नोंदवला जात आहे.
दरम्यान, मुनीर यांच्या अमेरिकेतील दौऱ्याला पाकिस्तानातील विरोधी पक्ष पीटीआय (इम्रान खान यांचा पक्ष) कडूनही तीव्र विरोध होतो आहे.
पीटीआयचे परदेशविषयक सचिव सज्जाद बुरकी यांनी ट्वीट करून, "या सरकारसोबत कोणताही करार पाकिस्तानातील जनतेला मान्य नसेल," असे म्हटले. त्यांनी 14 जून रोजी वॉशिंग्टन येथील पाकिस्तान दूतावासासमोर निदर्शने करण्याचे आवाहनही केले आहे.
या विरोधात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी-अमेरिकन समुदायाला सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असून, वॉशिंग्टनमधील मुस्लिम बहुल भागांत निदर्शनांबाबत माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली आहेत.