अमेरिकेच्या लॉस एंजेलिस काउंटीमध्ये जंगलात पुन्हा नवीन एक आगीचा वणवा भडकला आहे. 
आंतरराष्ट्रीय

लॉस एंजेलिसच्या जंगलात पुन्हा आगीचा भडका, हजारो लोकांचे स्थलांतर

Los Angeles wildfire | आगीचा धोका वाढणार, 'रेड फ्लॅग'चा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या लॉस एंजेलिस काउंटीमध्ये (Los Angeles wildfire) जंगलात पुन्हा नवीन एक आगीचा वणवा भडकला आहे. याआधीच येथील हजारो लोकांचे इतिहासातील सर्वात विनाशकारी आगींमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा येथे आगीचा भडका उडाल्याने भीती व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी लॉस एंजेलिस शहराच्या वायव्यकडील सुमारे ४५ मैल अंतरावर अनेक निवासी क्षेत्रे आणि शाळांना लागून असलेल्या डोंगराळ भागात आग लागली आहे. बुधवारी लागलेला वणवा काही तासांतच ९,२०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरला. जोरदार वारा आणि सुकलेल्या झुडुपांमुळे ही आग वेगाने पसरली आहे. सुदैवाने, यात कोणत्याही घराचे अथवा व्यवसायाचे नुकसान झालेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली जात असल्याचे म्हटले आहे.

ही नवीन आग या महिन्याच्या सुरुवातीला लॉस एंजेलिस परिसरात भडकलेल्या दोन मोठ्या आगींच्या उत्तरेच्या दिशेला आहे. येथील आधीच्या आगीने मोठे क्षेत्र जळून खाक झाले आहे. ही आग अजूनही धुमसत आहे.

आगीचा धोका वाढणार, रेड फ्लॅग वॉर्निंग जारी

ही आग आटोक्यात आणण्यासाठी विमानातून पाणी आणि ज्वालारोधके फवारली जात आहे. यामुळे डोंगराळ भागात नारिंगी रंगाच्या ज्वाळा दिसून आल्या आहेत. जोरदार वारे आणि कोरड्या, कमी आर्द्र हवामानामुळे आगीचा धोका वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या प्रदेशात पुन्हा एकदा रेड फ्लॅगचा इशारा देण्यात आला आहे.

३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश

बीबीसीच्या वृत्तानुसार, लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ रॉबर्ट लुना यांनी सांगितले की, या भागातील सुमारे ३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आणखी २३ हजार लोकांना या भागातून दुसरीकडे जावे लागू शकते, असा इशाराही दिला आहे. या भागातील एका तुरुंगातून जवळपास ५०० कैद्यांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे.

याआधीच्या आगीत २८ मृत्यू, १० हजार घरे जळून खाक

या महिन्याच्या सुरुवातीला पॅलिसेड्स आणि ईटन भागात लागलेल्या आगीमुळे किमान २८ लोकांचा मृत्यू झाला. तर १०,००० हून अधिक घरे आणि व्यवसाय आस्थापने जळून खाक झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT