पुढारी ऑनलाईन डेस्क: दक्षिण अमेरिकेतील चिलीतील अँटोफागास्ता येथे गुरुवारी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अँटोफागास्ता शहरापासून 265 किलोमीटर पूर्वेला 128 किलोमीटर खोलीवर होता. गुरुवारी (दि.१८ जुलै) रात्री ९.५१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, असे वृत्तात म्हटले आहे.
एएफपी वृत्तसंस्थेनुसार, अद्याप सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. बोलिव्हिया, पॅराग्वे आणि अर्जेंटिनापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले.
दक्षिण अमेरिकेतील चिली हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. हे पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. या भागात वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवतात. या भागात अनेक ज्वालामुखी उद्रेक होतात. 1960 मध्ये चिलीतील वाल्दिव्हिया येथे 9.5 तीव्रतेचा भूकंप झाला होता.1985 मध्ये वालपरिसो येथे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. भूकंपामुळे 177 लोकांचा मृत्यू झाला. 2010 मध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.