90 year Old Japanese Bodybuilder: वय म्हणजे फक्त एक आकडा आहे, असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र, ही गोष्ट प्रत्यक्षात सिद्ध करणारी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. जपानचे ९० वर्षीय तोशिसुके कानाजावा हे त्यापैकीच एक आहेत. या वयातही त्यांची शरीरयष्टी आणि फिटनेस पाहून तरुणांनाही आश्चर्य वाटेल.
वयाच्या ९०व्या वर्षी कानाजावा यांनी पुन्हा एकदा आपल्या फिटनेसची ताकद दाखवली आहे. त्यांच्या ९०व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी ‘ऑल जपान मास्टर्स फिटनेस चॅम्पियनशिप’ मध्ये ८५ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकावलं. विशेष म्हणजे, हे त्यांचं १९वं राष्ट्रीय विजेतेपद असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र कानाजावा यांच्या फिटनेसपेक्षा त्यांच्या आहाराची चर्चा अधिक होत आहे. इतक्या वयात मस्क्युलर शरीरयष्टी टिकवण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात मांस किंवा मासे खात असतील, असा अनेकांचा समज होऊ शकतो. पण प्रत्यक्षात ते मांस आणि मासे खातच नाहीत.
कानाजावा गेल्या अनेक दशकांपासून शाकाहारी आहार घेत आहेत. त्यांनी वयाच्या ३४व्या वर्षी बॉडीबिल्डिंगपासून ब्रेक घेतला होता. मात्र, वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी पुन्हा जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी मांस आणि मासे पूर्णपणे टाळले आहेत.
त्यांचा आहारही फारसा फॅन्सी किंवा महागडा नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये ते ब्राउन राइस, नट्टो म्हणजेच आंबवलेले सोयाबीन आणि मिसो सूप घेतात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही ब्राउन राइससोबत जपानी मसाला ‘फुरिकाके’ घेतात. याशिवाय ते दिवसातून तीन वेळा प्रोटीन ड्रिंक घेतात.
कानाजावा यांच्या जीवनशैलीमध्ये नियमित व्यायामासोबतच शिस्तबद्ध आहाराला महत्त्व आहे. त्यांच्या या दिनचर्येमुळेच ९०व्या वर्षीही ते फिटनेस स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत.
त्यांच्या फिटनेसच्या मागे एक भावनिक कहाणीही आहे. वयाच्या ३४व्या वर्षी बॉडीबिल्डिंग सोडल्यानंतर जवळपास १६ वर्षांनी त्यांनी पुन्हा जिममध्ये पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांची पत्नी आजारी होती. पत्नीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणावं आणि तिला आनंद मिळावा, या भावनेतून त्यांनी पुन्हा बॉडीबिल्डिंग सुरू केल्याचं सांगितलं जातं.
आज त्यांची पत्नी या जगात नाही. मात्र, तिच्या आठवणी आणि तिच्यासाठी सुरू केलेला फिटनेसचा प्रवास कानाजावा यांनी अजूनही थांबवलेला नाही.
दरम्यान, भारतातही आरोग्य आणि फिटनेस याबाबतची जागरूकता वाढत आहे. ‘लोकलसर्कल्स’च्या एका सर्वेक्षणानुसार, सुमारे ७.३ टक्के भारतीय आहारात बदल, व्यायाम आणि सप्लिमेंट्सच्या माध्यमातून स्वतःला अधिक तरुण आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं होतं.
मात्र, कानाजावा यांची कहाणी केवळ शाकाहारी आहारापुरती मर्यादित नाही. त्यामागे सातत्य, शिस्त, व्यायाम आणि मानसिक ताकदही महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीच्या फिटनेसवर केवळ आहाराचा परिणाम होतो, असा निष्कर्ष त्यांच्या उदाहरणावरून काढता येत नाही.
९० वर्षांच्या या फिटनेसप्रेमीचा प्रवास मात्र आजही सुरू आहे. त्यांचं पुढचं स्वप्न आहे ते म्हणजे हॉलिवूड स्टार आणि प्रसिद्ध बॉडीबिल्डर अर्नॉल्ड श्वार्झनेगर यांची भेट घेण्याचं. अर्नॉल्ड यांना ते अनेक वर्षांपासून आपला आदर्श मानतात. वयाच्या ९०व्या वर्षीही कानाजावा यांचा उत्साह कमी झालेला नाही.