इराणच्या नौदलाच्या एका युद्धनौकेवर हिंदी महासागरात अमेरिकेने हल्ला केल्यानंतर त्यातून धुराचे लोट निघत होते. 
आंतरराष्ट्रीय

US Sinks Iran Warship | हिंदी महासागरात अमेरिकेने बुडवली इराणची युद्धनौका

87 नौसैनिकांचा मृत्यू; 32 जणांना वाचवले; भारतातून परतत असताना ‘टॉर्पेडो’द्वारे केले लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

कोलंबो/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका-इस्रायल आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या युद्धाची धग आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणची युद्धनौका ‘आयआरआयएस डेना’वर टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवली. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने टॉर्पेडोचा वापर करून शत्रूचे जहाज बुडवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या हल्ल्यात जहाजावरील सुमारे 87 नौसैनिकांंचा मृत्यू झाल्याची माहिती श्रीलंका सरकारने दिली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत 32 जणांना वाचवले असून, त्यांना उपचारांसाठी गाले येथील कारापिटीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युद्धनौकेतून पाठवण्यात आलेले आपत्कालीन संकेत श्रीलंकेच्या नौदलाने टिपले आणि तत्काळ बचाव कार्य सुरू केले. संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्यानुसार मानवी मदतीसाठी श्रीलंकेने हे बचाव कार्य राबवले. विशेष म्हणजे, ‘आयआरआयएस डेना’ ही युद्धनौका 18 ते 25 फेब्रुवारीदरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित ‘मीलन इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू’मध्ये सहभागी झाली होती. भारतीय नौदलाने या जहाजाचे स्वागत केले होते. हा सराव आटोपून मायदेशी परतत असतानाच या जहाजाला लक्ष्य करण्यात आले.

या हल्ल्यामुळे हिंदी महासागरात अमेरिकेच्या फिफ्थ फ्लीट आणि इंडो-पॅसिफिक कमांडची मोठी उपस्थिती स्पष्ट झाली आहे. अमेरिकेने या भागात 15 ते 35 युद्धनौकांसह व्हर्जिनिया आणि लॉस एंजेलिस श्रेणीतील अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या तैनात केल्या आहेत. टॉर्पेडो हल्ल्यामुळे जहाजाचा कील (तळ) तुटल्याने बचाव पथक पोहोचेपर्यंत जहाज पूर्णपणे बुडाले होते. इराणने 28 फेब्रुवारीपासून अमेरिकन तळ असलेल्या देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्याने संपूर्ण मध्य पूर्व युद्धभूमी बनले आहे. यातच आता सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण करारामुळे पाकिस्तानही या युद्धात ओढला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतासाठी सामरिक पेच

भारत आणि अमेरिका ‘क्वाड’ गटाचे भागीदार असून, मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी वचनबद्ध आहेत. मात्र, भारताच्या जवळच अमेरिकेने केलेल्या या लष्करी कारवाईमुळे आणि इराणमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील स्थैर्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दक्षिण आशियात खळबळ

भारताच्या सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या बॅकयार्डमध्ये (हिंदी महासागर क्षेत्र) अमेरिकेने इराणची युद्धनौका ‘आयआरआयएस डेना’ टॉर्पेडो मारून बुडवल्याने दक्षिण आशियात खळबळ माजली आहे. या घटनेमुळे आता इराण-अमेरिका संघर्षाची झळ थेट भारताच्या दारापर्यंत पोहोचल्याची चर्चा संरक्षणतज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे. इराणसोबत भारताचे ऐतिहासिक आणि व्यापारी संबंध (विशेषतः चाबहार बंदर) असल्याने या घटनेचे भारतासाठी मोठे राजनैतिक परिणाम होऊ शकतात.

पेच टाळण्यासाठी योग्य जागेची निवड

अभ्यासकांच्या मते, अमेरिकेने भारताच्या सामरिक क्षेत्रात हा हल्ला केला असला, तरी तो भारताच्या अधिकृत सागरी सीमेबाहेर केला आहे. जर हे जहाज श्रीलंकेला वळसा घालून कोची किंवा गुजरातच्या किनार्‍यावरून गेले असते, तर ते भारताच्या अखत्यारीत आले असते. अशावेळी हल्ला करणे अमेरिकेला राजनैतिकद़ृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळेच श्रीलंकेजवळची जागा निवडण्यात आली, जेणेकरून भारतासोबत थेट वाद टाळता येईल.

पाकिस्तानचा सहभाग आणि वाढता धोका

एकीकडे इराणची नौका बुडवली जात असतानाच, दुसरीकडे पाकिस्ताननेही या युद्धात ओढले जाण्याचे संकेत दिले आहेत. सौदी अरेबियासोबत असलेल्या संरक्षण करारामुळे पाकिस्तान इराणच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी इराणला सौदीवर हल्ले न करण्याबाबत बजावले आहे. या सर्व घडामोडी पाहता, मध्य पूर्वेतील युद्धाचा भडका आता पूर्वेकडे सरकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आम्हीच बुडवली : अमेरिकेच्या संरक्षण सचिवांचा दावा

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी म्हटले आहे की, बुधवारी एका अमेरिकन पाणबुडीने ‘टॉर्पेडो’द्वारे लक्ष्य करून इराणी युद्धनौका बुडवली. दुसर्‍या महायुद्धानंतर पहिल्यांदाच पाणबुडीने अशा प्रकारे युद्धनौका बुडवली आहे, असा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT